काही दिवसांपूर्वीच मी PINK movie पाहिला. मला खूप आवडला म्हणून त्याविषयी काही लिहीतीये.
जन्म झाल्यापासून मुलगी आणी मुलगा हा भेद निसर्गाने केला आहे पण समाजाने तो चुकीच्या पद्धतीने लादत रहावा असे नाही. जन्म देण्याच वरदान आणी जबाबदारी दोन्ही स्त्री ला मिळाली आहे. पण ह्याचा अर्थ असा होत नाही की सगळी बंधने तिच्यावरच असावेत. भारतीय समाजाची मानसिकता खूप परखडपणे इथे मांडली आहे.
   ह्या movie चा plot असा आहे की एक मुलगी एका मुलावर attempt to rape ची case file करते. आणी तो मुलगा ह्या मुलीला Call Girl / sex worker ठरवतो आणी स्वतः सुटण्याचा प्रयत्न करतो. कोर्टमधे अमिताभ मुलींकडून ही case लढत असतो.  तेव्हा त्याने मांडलेले मुद्दे खूप सुरेख आहेत.
        मुलींनी रात्री घराबाहेर राहू नये आणी कामानिमित्त ती रहात असेल तर ती "तसलीच"  असण्याच लेबल लागत. मुलींनी skirts -  jeans सारखे कपडे घालू नयेत कारण असे कपडे वाईट प्रकार होण्यासाठी जबाबदार असतात. Social drinking करणाऱ्या मुली वाईट चालीच्या असतात पण मुलांनी drink केल तर ते फक्त health hazard आहे. जर एखादी मुलगी Party ला जात असेल आणी drink करत असेल तर तिच्यासोबत काहीही करता येईल असा मुलांचा समज असतो. एखादी मुलगी एखाद्या मुलासोबत कुठे बाहेर गेली तर त्यानंतरच्या प्रत्येक गोष्टीला तिची संमती समजली जाते. कारण काही गैरप्रकार झाला तर मुलाला काहीही न विचारता मुलीलाच म्हणतात की तू का तिथे का गेली होतीस?
     अमिताभने भारतीय विचारांचा संकुचितपणा दाखवून देतानाच मुलामुलींना खूप काही सांगितले आहे. प्रशासनावर विश्वास आणी आपल्या सुरक्षिततेसाठी असलेल्या कायद्याची माहिती असेल तर आपण आपल्या हक्कांसाठी लढू शकतो असा दावा केला आहे. मुलांनाही आम्ही equality ला मानतो पण तसे वागतो का ह्यावर विचार करायला लावला आहे. तसच मुलांना कोणत्याही स्त्री चा एक व्यक्ती म्हणून आदर करणे किती महत्वाचे आहे हे अधोरेखित केले आहे.  
        Movie मधे शेवटच्या युक्तीवादात असे सांगितले आहे की - स्त्री जेव्हा "नाही" म्हणते तेव्हा हा शब्द कृती थांबवण्याचा संकेत आहे आणी तो पाळलाच पाहिजे. ह्या Movie मधली मला आवडलेली काही वाक्य खाली देत आहे. 

- "हमारे यहाँ घडी की सुई लडकीयोंका character decide करती है"
- "Our system thrashes weak people"
- "अगर लडकीया लडकोंके साथ dinner या  drinks के लिये जाती है तो वो उनकी अपनी choice होती है available होने का sign board नही"
- "ना" सिर्फ एक शब्द नाही है... अपने आप मे पूर्ण वाक्य है
- "आज तक हम गलत direction मे effort करते रहे है... We should save our boys not our girls... because if we will save our boys then our girls will be safe". 

हा movie आवर्जून पाहण्यासारखा आहे. कारण हा movie पाहिल्यानंतर प्रत्येकजण,  आपण खरच प्रगत आणी स्त्री समानता मानणारे आहोत का हे पडताळून बघेल ह्याची मला खात्री आहे. 


Australia-Sydney मधे मे ते जून च्या काळात 3 आठवड्यासाठी Vivid Sydney चा festival असतो. वर्षातून एकदा होणारा हा सोहळा Lighting Festival म्हणून ओळखला जातो. ह्यामध्ये Sydney च्या central popular places वर lights project केले जातात.
ही संकल्पना 2009 ला सुरु झाली आणी 2012 ला जास्त famous झाली. 2012 ला 500, 000 पेक्षा जास्त लोक आले आणी जवळपास $ 10 million चा फायदा इथल्या सरकारला झाला. 2013 मधे हेच उत्पन्न $20 million पर्यन्त गेल.
मी ह्या जून मधे हा show Opera house, Harbor lights, The rocks, Circular Quay,  Central Park आणी Darling harbor इथे पाहिला. हा show free of cost असतो. खूप उत्तम तंत्रज्ञान वापरून सगळीकडे रमणीय देखावे तयार करतात. मला सगळ्यात जास्त Opera house आणी Harbor Bridge चे projections आवडले. मी पाहिलेल्या places चे काही फोटो इथे टाकत आहे. ह्या काळात कधी Sydney  ला आलात तर हा सोहळा मिस करु नका.

Circular Quay - Central Park

Circular Quay - Central Park
Circular Quay - Central Park

Circular Quay - Central Park


Circular Quay - Central Park

Circular Quay - Opera House

Harbor Bridge

Harbor Side

Darling Harbor

Darling Harbor




            मृत्युंजय ही कादंबरी जेव्हा मी पहिल्यांदा हातात घेतली तेव्हा ती पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवताच आली नाही. अतिशय सुंदर आणि रोमांचक पद्धतीने कथा गुंफली आहे. शिवाजी सावंत ह्यांच्या छावा आणि युगंधर ही पुस्तके पण वाचली आहेत. पण मृत्युंजय ह्या पुस्तकाच वेगळेपण म्हणजे ह्यातली भाषाशैली…. हे पुस्तक खूप साऱ्या पुरस्कारांनी गौरवले गेले आहे. शिवाजी सावंत ह्यांना "मुर्तीदेवी" पुरस्कार मिळाला आहे मृत्युंजयसाठी. आणि हे पुस्तक नऊ भाषांमध्ये भाषांतरीत केले आहे. कर्णाच्या जीवनावर आधारीत अजून एक पुस्तक आहे राधेय पण मला खर सांगायचं तर मृत्युंजय जास्त आवडल आणि मनाला भावल…

            खूप सुंदर पद्धतीने सगळी कहाणी कर्ण ह्या एका योध्याभोवती फिरते जो सर्वगुणसंपन्न असूनही महाभारतात नेहमीच दुर्लक्षित राहिला. जात-वंश -कूळ ह्या गोष्टींना महत्व अगदी प्राचीन काळापासून आहे. कर्ण हा कुंती आणि सूर्याचा (कुंतीला लग्नाआधी झालेला) पुत्र होता. त्याला जन्मतः कवचकुंडले मिळाली होती ज्यांच्यात अद्भूत शक्ती होती. कर्णाला कुंतीने गंगेत सोडून दिले आणि तो एका भल्या माणसाकडे त्याचा मुलगा म्हणून वाढू लागला. कर्णाला त्याच्या जन्माच्या अजब रहस्यामुळे (कुंतिपुत्र असूनही तो एका सारथीचा मुलगा म्हणून वाढत असल्यामुळे) सगळीकडे आयुष्यभर अपमानित केले गेले. कर्णाला द्रोणाचार्यांकडे धनुर्विद्या शिकायची खूप इच्छा होती पण ते फक्त क्षत्रियांनाच शिकवत असल्यामुळे त्यांनी कर्णाला शिकवण्यास नकार दिला. मग त्याने परशुरामाकडे शिकायचे ठरवले पण त्याचा नियम असा होता की तो फक्त ब्राह्मणानाच शिकवत असे. पण कर्णाला त्यांच्याकडून ब्रम्हास्त्र शिकून घ्यायचे होते म्हणून तो खोटे बोलून परशुरामाचा शिष्य बनला. पण त्याचे खोटे उघडकीला आल्यावर परशुरामाचा नियम मोडल्यामुळे त्याने कर्णाला शाप दिला कि जेव्हा त्याला ह्या ब्राह्मस्त्राची सगळ्यात जास्त गरज असेल तेव्हा त्याला ते आठवणार नाही.
       
           द्रौपदीचे स्वयंवर होते तेव्हा तिथे पांडव, कौरव आणि कर्ण असे सगळे आले होते. पण कर्ण समोर येताक्षणी तिने "मी सूतपुत्राला वरणार नाही" असा सगळ्यांसमोर त्याचा अपमान केला. कर्णाच्या ह्या सगळ्या जीवनात त्याची प्रेमळ अर्धांगिनी वृषाली नेहमीच त्याच्यासोबत होती. त्याच्या जीवनातल्या कटू प्रसंगांची तीव्रता वृषालीने केलेल्या हळुवार प्रेमाच्या वर्षावाने कमी झाली. कर्ण त्याच्या संसारीक जीवनात सुखी आणि समाधानी होता.

           कर्णाचा दानशूरपणाची सगळीकडे ख्याती होती. कोणीही याचक कर्णाकडे आल्यावर रित्या हातांनी जात नसे.  महाभारतातील शेवटचे युद्ध सुरु होण्याआधी कुंती कृष्णासोबत त्याच्याकडे आली व तिने तो तिचा पुत्र असल्याचे सांगितले. आणि त्याला पांडवांच्या बाजूने लढण्यासाठी विचारले. सगळ्यांकडून अवहेलना मिळालेल्या कर्णाला फक्त दुर्योधनाने जवळ केल्यामुळे तो शेवटपर्यंत दुर्योधनाशी मैत्रीच्या नात्यामुळे प्रामाणिक राहिला. पण त्याने वचन दिले की पांडवांपैकी तिचा एक तरी पुत्र जिवंत राहील. त्याने आपली कवचकुंडलेपण कुंतीला देऊन टाकली. कर्णाच्या दातृत्वाची परीक्षा घेण्यासाठी एका इंद्र याचकाचे रूप घेऊन आला. कर्ण नुकताच अंघोळ करून आल्यामुळे त्याच्याजवळ काहीच नव्हते तेव्हा इंदाने त्याच्याकडे आर्थिक मदतीची याचना केली. तेव्हा सगळे काही कळूनही थोडाही विचार न करता त्याने आपला सोन्याचा दात फोडून त्याला दिला.

          अश्या ह्या कर्णाला इतक्या सगळ्या गोष्टी असूनही अहंकारी असल्याचे म्हटले गेले. आणि हे पुस्तक वाचल्यानंतर कर्णाबद्दल आपण हळुवार होतो. त्याच्याकडे आणि महाभारताकडे पहायची एक वेगळी दृष्टी मिळते. जेव्हा कुरुक्षेत्रामध्ये ब्रह्मास्त्र न आठवल्यामुळे शेवटच्या क्षणी अर्जुनाकडून अंत होतो तेव्हा मन आतून हेलावते. असा हा कर्ण - एक चांगला पुत्र, चांगला पती, चांगला मित्र आणि सर्वगुणसंपन्न योद्धा आपल्या मनातून कधीच पुसला जात नाही.….


              एखाद्या movie बद्दल लिहिण्याची तशी माझी पहिलीच वेळ… हा movie पाहायला जाताना माझ्या मनात आधीच काहीही expectations नव्हते त्यामुळे जे समोर आला ते सगळ एक मस्त surprise होत अगदी पहिल्या scene पासून ते शेवटच्या scene पर्यन्त. मला हा चित्रपट खूप आवडला  म्हणून इथे लिहितीये… ह्या movie ची story खूप खास किवा वेगळी अशी नाहीये.  ह्यामध्ये सुद्धा २ भावाचा सत्तेसाठी असलेला संघर्ष दाखवला आहे. पण हा movie आवडण्याचे मुख्य कारण आहे त्याची मस्त Cinematography जी आतापर्यंतच्या कोणत्याही सिनेमापेक्षा नक्कीच वरचढ आहे. ह्या सिनेमातले action sequence खूप जबरदस्त आहेत. साधे साधे सीन ज्या grand scale वर मांडले आहेत त्यासाठी director ला मनापसून thanks ज्यामुळे इतका चांगला movie आपल्यासमोर आला. सगळ्यांची वेशभूषा पुराणकाळातील आहे आणि त्या काळातले वातावरण खरोखर आपल्यासमोर उभे रहाते. ह्या movie मधे खूप मोठ्ठा आणि सुंदर धबधबा दाखवला आहे. ही कमाल graphic ची आहे हे माहित असूनही तो खरा वाटतो. आणि युद्धाचे scenes खूप मस्त दाखवले आहेत. युद्धाच्या मैदानात एकाच वेळी खूप गोष्टी सुरु असतानाही आपला गोंधळ न उडता आपण तिथले सगळे special effects enjoy करू शकतो. आणि जिथे movie म्हणजेच हा पहिला भाग संपतो, तो scene खूप चांगला निवडला आहे ज्यामुळे आपली उत्सुकता सुरु होते पुढचा भाग पाहण्यासाठी. 
          हा चित्रपट मूळ तेलगु आणि तमिळ भाषेत तयार झाला असून त्याला हिंदी, मल्याळम आणि फ्रेंच मध्ये डब केले आहे. त्यामुळे पूर्ण चित्रपटात south style दिसून येते. ह्या चित्रपटाचे २ भाग आहेत ज्यातला एक भाग जुलै मध्ये प्रदर्शित झालेला असून दुसरा भाग जानेवारी २०१६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. ह्या पूर्ण चित्रपटाचे काम ३ वर्ष चालू होते आणि जवळपास २५० कोटी हा movie बनवायला लागले आहेत.  सध्याच्या news प्रमाणे ह्या चित्रपटाच्या पहिल्या भागानेच ५०० कोटीचा आकडा पार केला असून अजून दुसरा भाग यायचा बाकी आहे. :)

 मी इथे movie ची story सांगणार नाहीये फक्त मला त्यात काय आवडल ते सांगणार आहे.

 प्रभास ह्या movie मध्ये बाहुबली आणि शिवा अश्या double role मधे  दिसला आहे. प्रभासने ह्या दोन्ही भूमिका खूप चांगल्या निभावल्या आहेत. संपूर्ण चित्रपटात त्याने ह्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत दिसून येते. उत्तम वेशभूषा, चांगला अभिनय, उच्च प्रतीच्या techniques, आणि special effects ने तयार झालेले action sequences ह्यामध्ये ह्या दोन्ही roles मस्त वाटले आहेत.
               
राणा ने भल्लालदेव हा grey shade असलेला role खूप चांगला केला आहे. आणि मला आवडलेली गोष्ट म्हणजे हे character सुद्धा hero सारखे सर्व आघाड्यावर सर्वगुणसंपन्न दाखवले आहे. फक्त hero ची प्रजेविषयीची आत्मीयता आणि त्याची चांगली वृत्ती त्याला सर्वार्थाने नायक बनवते. राणाने Bollywood मध्ये  "दम मरो दम" हा movie केला आहे.

 तम्मना ने अवन्तिकाचा role केला आहे. पूर्ण चित्रपटात ती खूप सुंदर दिसली आहे. तिचा role खूप मोठा नाहीये पण तिने movie मधे action scenes चांगले perform केले आहेत.


 अनुष्का ने बाहुबली(प्रभास) ह्या पात्राच्या पत्नीची आणि शिवा(प्रभास) ह्या पात्राच्या आईची भूमिका निभावली आहे. movie मधे ती आपल्या मुलाची वाट पाहत असते तेव्हा करण अर्जुन सिनेमातल्या राखी ची आठवण येते. :P पहिल्या भागात तिचा  role तसा कमी आहे पण बाहुबलीच्या पुढच्या भागात बहुतेक तिची कथा मांडली आहे.

 सत्यराज नावाच्या अभिनेत्याने कट्टापा हा role केला आहे. जे लोक Whats-app वापरतात त्यांना हे नाव माहित नाही असे होणार नाही कारण कट्टापाच्या messages ने खूप धुमाकूळ घातला होता. ह्या अभिनेत्याने हा role संपूर्ण ताकदीने निभावला आहे. director ने त्याचा पेहराव, त्याचे dialogues आणि त्याची बोलण्याची आणि चालण्याची पद्धत ह्या सगळ्यावर मेहनत घेतली आहे.

 राम्या ने शिवगामी चा role खूपच चांगला केला आहे. राजमातेचा म्हणजे भल्लालदेवच्या आईचा म्हहत्वाचा role तिने केला आहे. तिच्या role मधे - राजकारणी धोरण असलेली, मुत्सद्दी, शिस्तप्रिय, तडफदार  आणि न्यायाने वागणारी स्त्री असे विविध पैलू आहेत. तिच्या संपूर्ण पेहरावावरून आणि चित्रपटातल्या वावरामध्ये राजघराण्यातला डामडौल आणि तेज दिसून येते.



ह्या movie ची सगळ्यात चांगली गोष्ट आहे ती म्हणजे Hollywood ची बरोबरी करेल अशी Cinematography. हा movie पाहून नेहमीच्या typical Bollywood मसाला movies मधून ब्रेक मिळतो. आणि सगळे special effects खूप मस्त shoot केले आहेत. सगळ्यांनी हा movie एकदा तरी पाहावा.

 



         वाचण्याची आवड असलेल्या प्रत्येक व्यक्तीला दिवाळी अंक वाचण्याच काय सुख असत ते नक्कीच कळेल. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मस्तपैकी फराळाचा आस्वाद घेत दिवाळी अंक वाचत लोळत पडण्यासारख सुख नाही... :) लहान असताना अगदी नेहमीच्या वाचण्यातली पुस्तके म्हणजे "चंपक", "चांदोबा", "ठकठक", "किशोर" आणि "चाचा चौधरी" वगरे. ही सगळी पुस्तके दर महिन्याला तर असायचीच पण दिवाळी अंक असेल तर खूप मोठ्ठा असायचा म्हणून त्याच वेगळं आकर्षण वाटायचं.
         आणि आता सुद्धा ह्या पुस्तकांना वाचताना जरी मजा येत असेल तरी पण काही खास दिवाळी अंक वाचल्याशिवाय चैन पडत नाही. काही आवर्जून वाचण्यासारखे म्हणजे माहेर, मेनका, मानिनी, मिळून साऱ्याजणी, दीपलक्ष्मी, नवल, विपुलश्री आणि मौज वगरे.. ह्या सगळ्या अंकामधला मजकूर अगदी दर्जेदार असतो. एक एक अंक असा जो एकदा हातात घेतला की सोडवतच  नाही. ह्यामध्ये सामाजिक लेख, उत्तमोत्तम मुलाखती, नवीन सिनेमांची परीक्षणं अश्या कित्येक गोष्टी असतात. प्रत्येक अंकामध्ये पाककृतींचा खजिना आवर्जून असतोच.  सगळ्या दिवाळी अंकामध्ये २ गोष्टी नक्की असतात एक म्हणजे दर्जेदार व्यंगचित्रे आणि वार्षिक भविष्य... भविष्य वगरे सारख्या गोष्टीवर विश्वास असो किवा नसो पण उत्सुकतेपोटी एकदा तरी हे भविष्य नजरेखालून घातले जातेच. :) 
          खूप सारी चांगली मासिके आहेत ज्यांचे दिवाळी अंक अगदी खास असतात. तसेच वेगवेगळ्या वृत्तपत्रांचे सुद्धा दिवाळी अंक दरवर्षी प्रकाशित होतात. ह्या सगळ्यांमध्ये येणारे म्हणजे  कालनिर्णय, लोकमत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, सामना, चित्रलेखा, तनिष्का, गृहशोभिका, चारचौघी, श्री व सौ आणि अजून बरेच... चारचौघी मासिकाचे मेहंदी विशेषांक आणि उखाणे विशेषांक हे खूपच खास होते. ज्यांना पोलिसी कथा वाचायला आवडतात त्यांच्यासाठी पोलीस टाईम्स, दक्षता, धनंजय आणि गुन्हेगार हे उकृष्ट दर्जाचे अंक आहेत. ज्यांना विनोदी अंक वाचायला आवडतात त्यांना तर खूप पर्याय उपलब्ध आहेत. जसे की मार्मिक, हसवंती, आवाज, धमाल धमाका, फिरकी, जत्रा, आणि श्यामसुंदर. आवाज आणि जत्रा मासिकांमध्ये मुखपृष्टावर असलेली खट्याळ खिडकी आपल्याला हसवल्याशिवाय राहत नाही. :)
          वैद्यकशास्त्रावर (मेडिकल) ज्यांना वाचन करायला आवडते ते "शतायुषी" अंक घेतल्याशिवाय रहात नाहीत. ह्यामध्ये वेगवेगळ्या रोगांची सखोल माहिती, त्यावर असलेली एकदम नवीन उपचार पद्धती, डॉक्टरांचे सर्जरीचे अनुभव, रुग्णांचे अनुभव आणि त्यांनी किचकट रोगांशी दिलेला अभूतपूर्व लढा ह्या सगळ्या गोष्टी असतात. दरवर्षी ह्यांचा एका खास रोग किवां उपचार पद्धतीचा विशेषांक असतो.
           आजकाल इंटरनेटच्या युगात ज्यांना प्रत्यक्ष पुस्तक वाचायला वेळ नाहीये किवा वाचण्याचा कंटाळा येतो त्यांना ऑनलाईन दिवाळी अंकाचे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत. ह्यापैकी काही ऑनलाईन विकत घ्यावे लागतात तर काही मोफत उपलब्ध असतात.  ह्यावर्षी मी ऑनलाईन "हितगुज"(मायबोलीने प्रकाशित केलेला), "मनोगत" आणि "लोकप्रभा" वाचले आहेत. ह्यावर्षीच्या हितगुजच्या अंकात "तंत्र -मैत्र" ह्या सदरात ऑनलाईन कोर्सविषयीची खूप उपयुक्त माहिती आली आहे. ही माहिती https://www.coursera.org/ इथे सापडेल. तसेच कथाविश्व ह्या सदरात खूप छान कथा आहेत. तर मनोगत मध्ये ह्यावर्षी वेगवेळ्या विज्ञानकथांनी हजेरी लावली आहे. तसेच एक "रिक्त" नावाची कौटुंबिक कथा आहे जी मनाला चटका लावून जाते. आणि मनोगतच्या पाककृती विभागात वेगवेगळ्या प्रकारचे आप्पे, वड्या ह्यांनी खास करून हजेरी लावली आहे. तसेच ह्या वर्षी काही नवीन दिवाळी अंक पहिल्यांदा ऑनलाईन आले आहेत जसे की "मिसळपाव" आणि "ऐसी अक्षरे".
            असे हे दिवाळी अंक सगळ्या वाचकांसाठी बौद्धिक फराळच आहेत. सगळ्या वाचनप्रेमींनी ह्याचा लाभ घ्यावा ह्यासाठी ही पोस्ट टाकण्याचा खटाटोप केला आहे. :)
       






        दिवाळी हा आपल्याकडे लहान-मोठ्यांपासून सगळ्या धर्मांमध्ये मोठ्या प्रमाणांवर साजरा केला जाणारा सण आहे. आणि मला खास करून दिवाळी खूप आवडते. कारण दिवाळी जवळ आली की काही दिवस आधीपासूनच सगळी तयारी सुरु होते. सगळ्यात आधी सुरुवात होते ते खरेदीची. नवीन ड्रेस, फटाके, रांगोळ्या आणि आकाशकंदील किवां तो बनवायचे सामान वगरे... :)
        कोजागिरी पौर्णिमेपासून आपण आकाशकंदील लावतो. लहानपणी आम्ही  उत्साहाने घरीच आकाशकंदील बनवत असू. आजकाल मात्र खरच विकत आणण्यामुळे तो बनायची मजा खूप मिस करत आहे मी. रांगोळी काढणे हा एक आवडीचा कार्यक्रम असायचा. दरवर्षी काहीतरी नवीन शक्कल लढवून रांगोळी सजवायचो. कधी फुलांच्या पाकळ्या, कधी चमकी कधी वेगवेगळ्या पणत्या सजवून केलेली सजावट, कधी लाकडाचा भुसा रंगवून तो रांगोळीत भरायचो आणि कधी कधी तर तांदूळ रंगवून ते रांगोळीमध्ये भरायचो.

           दिवाळीमध्ये न विसरता येण्यासारखी गोष्ट म्हणजे फराळ. दिवाळीच्या २-३ दिवस आधीपासूनच आई फराळ बनवायला सुरुवात करायची. त्यात असायचे ते चिवडा, लाडू, चकली (माझा सगळ्यात आवडता पदार्थ), शेव, करंजी, शंकरपाळे आणि अनारसे. कितीदा तरी आईला मदत करायच्या बहाण्याने काही पदार्थांना थोडे थोडे खाउन पाहिले आहे. :) हा फराळ आजकाल बाराही महिने बाहेर जरी मिळत असेल तरी दिवाळीच्या दिवसांत ह्या फराळाची चव काही वेगळीच लागते. आणि आईच्या हाताची चव ह्या सगळ्या पदार्थांची लज्जत खूप वाढवते.

          दिवाळीच्या पहाटे म्हणजेच नरकचतुर्दशीला लवकर अंघोळ केली नाही तर नरकात जाऊ अशी लहानपणी खूप भीती वाटत असे. :) आणि त्यामुळेच एरव्ही कधी लवकर न उठणारे आम्ही ह्या दिवशी न चुकता लवकर अंघोळ करून घ्यायचो. अभ्यंगस्नान म्हणजे आई आम्हाला अंघोळीच्या आधी ओवाळायची, तेल लावून द्यायची आणि मग मस्त पैकी वासाचे तेल आणि उटणे ह्यासोबत अभ्यंगस्नान पार पडायचे. अजूनही अभ्यंगस्नान असेच पार पडते फक्त आता मी माझ्या सासरी असते. :)

           आम्ही दरवर्षी भाऊबीजेसाठी आजोळी जायचो. तिथे मामा - मावशी आणि   आम्ही सगळे भावंड खूप मजा करायचो. तिथे आजोबांनी आमच्यासाठी फटाके आधीच आणून ठेवलेले असायचे ते पण एकदम भरभरून... :D अगदी काय उडवू  आणि काय नको असा होऊन जायचं. तिथे जो फटाका जरा कमी प्रमाणात असायचा त्याच्यावरूनच सगळ्यांची भांडाभांडी व्हायची. मग कसेतरी करून वाटणी व्हायची आणि थोड्या वेळासाठी शांतता असायची. आणि बच्चेकंपनी म्हणजे आमचे लहान भावंड आमच्याकडून अगदी भांडून फटाके वगरे घायचे पण त्यांना भीती वाटत असल्यामुळे ते उडवण्याची जिम्मेदारी पुन्हा आमच्यावरच यायची. :)     

         आता ही सगळी मजा जरी आठवणींमध्ये राहिली असली तरी नव्या पद्धतीने आपण दिवाळी साजरी करू शकतो. Eco-Friendly दिवाळी साजरी करण्याची आपल्या पर्यावरणाची गरज आहे. जास्त फटाके न फोडता हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण कमी करण्यात आपण हातभार लावायला हवा. ह्या दिवाळीमध्ये सगळ्या वाईट गोष्टी जाळून जावोत, जुनी भांडणे आणि रुसवे - फुगवे विरून जावोत आणि नव्या इच्छांचा आणि नवीन कल्पनांचा दीप सर्वांच्या मनात अखंड तेवत राहो...  सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!!
         


           
           आज मी तुम्हाला आमच्या घरातल्या सगळ्या खास सदस्यांची ओळख करून देणार आहे. माझे लग्न झाल्यावर लहानपणीचा खेळ पुन्हा नव्याने सुरु झाला आहे असच वाटल मला... जस लहानपणी आपण आपल्या आवडत्या खेळण्यांना नाव देतो (विशेषकरून बाहुल्यांना) तस इथे आम्ही घरातल्या काही वस्तूंना मस्त नावे दिली आहेत. सगळ्यात आधी सांगेन ते आमच्या TV बद्दल... त्याच घरातलं लाडक नाव आहे "स्टीव्ही".. आशिष (माझा नवरा) F.R.I.E.N.D.S. च्या series चा जबरदस्त चाहता आहे. आणि हे नाव त्या series मधूनच घरात आले आहे. आणि आमच्या स्टीव्हीची खासियत म्हणजे ह्यामध्ये PIP (Picture In Picture) आहे. म्हणजे ह्यात एकाच वेळेस २ channels पाहता येतात. अर्थात आवाज एका channel चा ऐकू येतो पण हरकत नाही... :)
          अजून एक सदस्य म्हणजे आशिषची bike जिच नाव "सूझी" आहे. एकदम गर्लफ्रेंडच नाव असाव अस नाव आहे हीच.... ही पण फार लाडकी आहे आमची.... आम्ही बंगलोरला असताना तिच्यासोबतीने बंगलोर ते म्हैसूर अशी मस्त outing केली आहे.
         आणि त्यानंतर आहे आमचा लाडका "चिंटू" म्हणजेच आमचा laptop ह्याचे लाड सगळ्यात जास्त होतात. त्याला सतत कोणीतरी मांडीवर घेऊन बसलेले असते. आणि हा चिंटू आमच्या लग्नाच्या आधीपासून घरात असल्यामुळे पर्यायाने मी ह्याची सावत्र आई आहे म्हणे.. :) ह्याचे खरे कारण असे कि मी वापरल्यानंतरच काही दिवसात चिंटूची battery जरा खराब झाली म्हणजे लवकर discharge व्हायला लागली. कारण मी त्याचा सावत्र असल्याने जाच केला आहे म्हणे :( त्याचे कितीही लाड केले तरी शेवटी मी सावत्र आई आहे हे काही सत्य बदलणार नाही ना.. ;) काय करणार हे सुद्धा पचवले आहे मी आतापर्यंत....
           आमच्या घरी जुळे सदस्य पण आहेत जे खूपच आवडीने घरात आणले आहेत. त्यांची नावे आहेत "गोलू" आणि "मोलू"  जे दुसर तिसर काही नसून bean bags आहेत. आणि ह्यांना आम्ही हट्टाने एकदम मोठ्ठ्या आकारात बनवून घेतले आहे. कॉफ्फी कलरच्या ह्या bags Double XL नाहीतर त्यापेक्षाही थोड्या  मोठ्या आहेत. आणि इतक्या आरामशीर आहेत की त्यात कित्येकदा मी दुपारी जेवण झाल्यावर पेंगत पेंगत निवांत झोपले आहे. :D
          आमच्याकडे एक MP3 player नाहीतर i Pod म्हणता येईल असा पण एक सदस्य आहे. त्याचे नाव "झून" आहे. दिसायला एकदम ओबडधोबड असा आहे पण खूपच मजबूत आहे. खूप वेळा तो हातातून पडला आहे पण इंचभरही खरचटले नाहीये त्याला.. :) आमच्या सगळ्या outings मध्ये न थकता त्याने आम्हाला साथ दिली आहे. ५ ते ६ तास सलग वापरले तरी त्याला जेवायची म्हणजेच charge करायची गरज पडत नाही. :)
          आणि शेवटचा सदस्य म्हणजे आशिषचा फोन. त्याच नाव पण एकदम  cool आहे "रोमिओ"...  आता अस का आहे नाव हे मला अजूनही माहित नाहीये पण म्हटलं जाऊ दे तितकच काहीतरी वेगळ... :) तर ही  सगळी मंडळी आमच्या दोघांनाही आमच्या मुलांसारखी आहेत. ज्यांना कोणाला ह्या मंडळीची नावे माहित आहेत  ते पण त्यांना आवर्जून ह्याच नावांनी हाक मारतात. अजून नवीन सदस्य जमेल तसे घरी येत राहतील. तोपर्यंत आम्ही ह्या गोतावळ्यासोबत सुखाने नांदत आहोत. :)          
          





आजचा दिवस अतिशय शुभ समजला जातो. कारण हा मराठी संवत्सरातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. त्यामुळे कोणतेही नवीन कार्य ह्या दिवशी सुरु करतात. लहान मुलांकडून ह्या दिवशी सरस्वतीचे पूजन करवून त्यांच्या  शिक्षणाचा श्रीगणेशा करतात.

पुराणकाळात महिषासूर नावाचा एक राक्षस होऊन गेला. आपल्या दुष्ट कृत्यांनी त्याने पृथ्वीवर हाहाकार माजवला होता. त्याचा वध एका स्त्री च्या हातून होईल आणि अन्य कोणी त्याला मारू शकणार नाही असा त्याला वर मिळालेला होता. अशी स्त्री तिन्ही लोकात नाही म्हणून तो खूपच उन्मत्त झाला होता. तेव्हा अष्टभुजा देवीने अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी असे दहा दिवस त्याच्याशी तुंबळ युद्ध करून दहाव्या दिवशी त्यास ठार मारून त्याच्यावर विजय मिळवला. म्हणून या नऊ  दिवसांना नवरात्री आणि ह्या दहाव्या दिवसाला 'विजयादशमी' असे म्हणतात. शौर्य, विजय, संपत्ती आणि विद्या देणारा हा महत्वाचा दिवस आहे.

त्या काळी रघु नावाचा एक उदार आणि विद्वानांना आश्रय देणारा एक राजा होता. कौत्स नावाच्या ब्राम्हणाला गुरुदक्षिणा म्हणून आपल्या गुरूंना १४ कोटी सुवर्णमोहरा हव्या होता. तेव्हा कौत्स मदत मागण्यासाठी रघु राजाकडे आला. रघु राजने आपली सगळी संपत्ती आधीच दान केल्यामुळे त्याचाकडे इतकी संपत्ती नव्हती. पण त्याने कौत्साला ३ दिवसात इतक्या सुवर्णमोहरा देण्याचे आश्वासन दिले. आणि रघु राजाने इंद्रासोबत युद्ध पुकारले. तेव्हा कुबेराने घाबरून अयोध्यानगरच्या बाहेरील शमीच्या आणि आपट्याच्या झाडांवर सुवर्णमोहरांचा वर्षाव केला. तेव्हा रघु राजाने त्यातील फक्त १४ कोटी सुवर्णमोहरा कौत्साला दिल्या आणि बाकी सगळ्या मोहरा प्रजाजनांमध्ये लुटवून टाकल्या. त्याचे प्रतिक म्हणून आजच्या दिवशी शमीच्या झाडाची किवा आपट्याच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. पूजा झाल्यानंतर ह्या झाडांची पाने लुटतात आणि ती आप्तेष्टांना सोने (सुवर्णमोहरांचे प्रतिक) म्हणून वाटतात.

ह्याच दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करण्यासाठी प्रस्थान केले आणि त्यांना विजय मिळाला म्हणून हा दिवस शुभ मानतात. तसेच अज्ञातवासात पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडात लपवून ठेवली होती अशी आख्यायिका आहे. आणि अज्ञातवासानंतर पांडवांनी ह्याच झाडातून आपली शस्त्रे धारण केली. म्हणून ह्या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते. ह्या दिवशी सरस्वतीपूजनासोबतच घरामध्ये असलेल्या वाहनांची आणि पोथी - पुराणांची पूजा केली जाते. आणि व्यापारी लोक ह्या दिवशी आपल्या यंत्रसामुग्रीची आणि कामाच्या हत्यारांची पूजा करतात.  आणि हा दिवस सोने खरेदीसाठी सुद्धा शुभ मानला जातो.

म्हणूनच सर्व वाचकांना हा सण खूप आनंदाचा आणि भरभराटीचा जावो...!!!  "दसरा सण मोठा आणि नाही आनंदाला तोटा..!!!"



आज Friendship Day निम्मित माझ्या डायरीतून माझ्या सगळ्या मित्र- मैत्रिणींसाठी काही ओळी...
शिंपल्यात घालून समुद्र कधी दाखवता येत नाही
हाताने काढलेल्या फुलांचा कधी सुगंध येत नाही
निळ्याभोर गगनाचा अंत कधी होत नाही
खऱ्या मैत्रीपूर्ण भावनांचा उल्लेख शब्दात कधी होत नाही..



आज खूप दिवसांनी ब्लॉगवर काहीतरी टाकण्याचा मूड झाला... मनात विचार आला की अश्या कितीतरी म्हणी असतील ज्या आधीच्या काळात नेहमी बोलण्यात येत असतील पण आता त्या माहीत सुद्धा नसतील... ह्या म्हणींना आठवण्याचा एक प्रयत्न म्हणून मी माझ्या आजीला हट्ट करून करून काही  म्हणी आठवायला लावल्या आणि त्या मी इथे टाकत आहे... ह्यातल्या बऱ्याच म्हणी कदाचित माहीत असतील पण तरीही जराशी मजा म्हणून...

- वेल्हाळीला दुक्ख झाल चोळून चोळून लाल केल...
- खादाड खाऊ लांडग्याचा भाऊ..
- नाकापेक्षा मोती जड
- दात आहेत तर चणे नाहींत आणि चणे आहेत तर दात नाहीत
- बाजारात तुरी भट भटणीला मारी
- नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा
- आवळा देऊन कोहळा काढणे
- ताकाला जाऊन भांड लपवणे
- मला पहा आणि फुलं वाहा
- तोंडात तीळही न भिजणे 
- आपला तो बाब्या आणि दुसर्याचे ते कार्टे
- सोय जाणेल तो सोयरा
- दुसर्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसत पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही
- घोडा आपल्या गुणाने दाणा खातो
- घरात नाही दाणा म्हणे मला बाजीराव म्हणा
- कोंबडा आरवला नाही तरी उजाडायच राहत नाही
- सरड्याची धाव कुंपणापर्यंत
- जावायाच पोर हरामखोर
- मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली (ही म्हण मकरंद अनासपुरेच्या तोंडून एका पिक्चरमधे ऐकली आहे... :) )



         कोणी कितीही सीरिअलच्या नावाने आरडा ओरडा केला तरीही अश्या खूप कमी व्यक्ती असतील ज्यांनी एकही सीरिअल TV वर पाहिली नसेल.. कौटुंबिक सीरिअल साठी मात्र तमाम पुरुष मंडळीचा अपवाद म्हणता येईल.. पण खर सांगायचं तर आता आपल्या बाबांच्या वयाचे लोक सुद्धा आई लोकांमुळे एखादी सीरिअल तरी (चुकून ?) पाहतातच.. :) हं तर नमनाला घडाभर तेल म्हटल्यासारख मला काय सांगायचं आहे ते राहूनच गेल.. आता माझ्या मनातले काही निरागस प्रश्न मांडणार आहे... :)
       सीरिअलमधली हिरोईन ही नेहमीच खूप सरळसाधी अन्याय सहन वगरे करणारी, घरातल्या व्यक्तींची नको तितकी काळजी घेणारी, जे लोक तिच्याशी खूप वाईट वागतात त्याचं चांगल व्हाव म्हणून देवाला साकड वगरे घालणारीच का असते? त्याचं हे अति चांगल वागणं कधी कधी विचार करायला लावत की ह्यांना काही स्वाभिमान वगरे आहे की नाही? आणि ह्या सगळ्या त्यागाच्या मूर्तींना घरालेच काही लोक वेगवेगळ्या नात्यांच्या रुपात त्रास देत असतात. मजा म्हणजे ह्यांना माहीत असत आपल्याला कोण त्रास देऊ शकत आणि आधी पण त्रास दिलेला आहे तरीपण पुन्हा पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवून ह्या नेहमी का गोत्यात येतात? ह्यांना नॉर्मल लोकांसारखा राग वगरे का येत नाही? ह्यांना कधीच कोणाला धडा शिकवावा वाटतात नाही का?  :) 
          आधी असं होत की हिंदी सीरिअल मधे काहीही चालायचं.. जस की ज्याचं एकमेकांवर प्रेम असेल त्याचं एकमेकांशी लग्न होणार नाही दुसर्या कोणाशीतरी होईल... :) हिरो आणि हिरोईनला सावत्र बहिण किवां भाऊ असलेच पाहिजेत म्हणजे त्यांना त्रास सहजपणे देऊ शकतील. आणि इथे पात्रांचे कितीही वेळा लग्न होऊ शकतात अर्थातच वेगवेगळ्या व्यक्तीसोबत ... :) आणि अजून एक चमत्कारिक गोष्ट म्हणजे एखादा मेलेला व्यक्ती अचानक जिवंत होणं किवां त्याच्यासारखा दिसणारा व्यक्ती परत त्याच कथानकात अवतरणं. हा डिरेक्टरचा फेवरेट ट्विस्ट आहे. :)  आता अतिशयोक्तीची कमाल म्हणजे आणि  medical science ची खिल्ली उडवणारा अजून एक प्रकार म्हणजे कोणत्याही character चा accident झाला की त्याची plastic surgery नक्की होणार. मग ती व्यक्ती नवीन ओळख घेऊन कथानकात येणार आणि स्वतःच्या अन्यायाचा बदला घेणार.. आणि हो plastic surgery झाली की ह्या व्यक्ती बारीक असेल तर जाड किवां जाड असतील तर बारीक होऊ शकतात.. त्यांची संपूर्ण अंगकाठी आणि हेअर स्टाइल वगरे सगळ काही बदलत... भारी आहे बुवा..!! :) आणि आता ह्या सगळ्या गोष्टी मराठी मालिकांमध्ये सर्रासपणे आल्या आहेत. फक्त बदल इतकाच की पात्रांची नाव मराठी आहेत आणि ह्या सिरिअल्समध्ये  सगळे मराठी सण साजरे होतात :) पण ह्या सगळ्या सिरिअल्समध्ये नेहमी वाईटच गोष्टी का चालू असतात? नेहमी कट - कारस्थान का सुरु असतात?  कधी कधी इतक्या सारख्या गोष्टी २-३ मालिकांमध्ये सुरु असतात की पुढे काय होईल ते आपण सहज ओळखू शकतो... खरं सांगायचं तर ह्या सगळ्याचा आता वीट आला आहे.. कुठेही पहा तेच.. पण तरीही नवीन सीरिअल आली कि सगळेजण अशी अपेक्षा करतात कि कदाचित काहीतरी वेगळं असेल.. :)
               म्हणूनच आता सगळ्यांचा मोर्चा Reality Shows कडे वळला आहे. कारण इथे आपल्या काहीतरी knowledge मिळतं जरा मनोरंजन होते. काही खरोखर चांगले Reality Shows आहेत ते म्हणजे KBC, सारेगमप, Cookery Shows, Comedy Shows, Dance Competitions... आणि हो  Rodies  पण.. तितकंच काहीतरी वेगळं पाहायला मिळत त्यात.. पण आता ह्या shows मधे तोचतोचपणा येऊ नये नाहीतर पुन्हा कौटुंबिक सीरिअल मधे अडकलो तर डोक्याचा भुगा व्हायला वेळ लागणार नाही..   






आनंद घेऊन आला हा "दसरा" सोने लुटून करूया साजरा..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी इच्छा... सोन्याहून अनमोल अश्या माझ्या शुभेच्छा...!!!


माझ्या ब्लॉगच्या सगळ्या वाचकांना आणि पाहुण्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा.. :)




ह्या रोजच्या ऑफिसच्या गडबडीत कधी कधी मला वाटत की मी मान वळवून सुद्धा पहात नाही...  आमच्या घराच्या जवळ इतक्या छान गोष्टी आहेत ज्या मी इतक्या दिवसांमध्ये नीट पहिल्याच नव्हत्या. मागच्या २-३ वीकेंडला मी आमच्या घरासमोरच्या छोट्याश्या बागेत जाऊन आले. खूप मस्त वाटल.. अस वाटल की कितीतरी वर्षांनी मी झाडांना-पानांना-फुलांना इतक्या जवळून पहात आहे.. वेगवेगळ्या फुलांचे वास घेताना एकदम फ्रेश वाटल.. हा वास आपण रोज वापरतो त्या deo आणि perfume पेक्षा कितीतरी रेफ्रेशिंग होता.. :)    
           आमच्या घराच्या gallery मधे आजकाल बरेच जण हजेरी लावतात.. त्यात नेहमी येणारे छोटे पाहुणे म्हणजे साळुंक्या.. चिमण्या आणि कावळे आहेत. कावळा तर रोज सकाळी सकाळी ठरलेल्या वेळेत येतो. तिथे त्याला आधीच खायला ठेवलं असेल तर ठीक आहे नाहीतर आरडाओरडा करून आम्हाला बोलावतो. मग एकदा त्याला खायचं ठेवलेलं दिसलं की त्याच्या ओळखीच्या मंडळींना बोलवून मस्त ब्रेकफास्ट करतो.. एका दिवशी चिमणी तर तिच्या २ छोट्याश्या पायांवर उडी मारत आमच्या hall मधे आली.. :) मला एकदम लहानपणीचे दिवस आठवले जेव्हा मला आई चिऊ - काऊ दाखवत जेवायचे घास भरवायची.... असं म्हणतात की पक्षी ज्या घरात जातात त्या घरात +ve energy असते. संध्याकाळी बागेत झाडांना पाणी घातले होते तेव्हा मला खूप आवडणारा मातीचा वास आला. एखादी आवडणारी गोष्ट अचानक घडल्यावर जस वाटत ना तस वाटल अगदी. 
           माझ्या एकटीची परफेक्ट संध्याकाळ कशी असू शकते माहीत आहे? घराच्या टेरेस मधे मी आमच्या गोलू - मोलू (बीन bags) वर बसलेली असेन. बाहेर मस्त गार वारा सुटलेला असेल. वार्याचा आवाजच इतका आवडेल की कानात गाणे ऐकण्यासाठी headphones पण टाकणार नाही... हातात एखादी मस्त कादंबरी असेल... हातातल्या वाफाळत्या कॉफ्फीची चव घेत मी कादंबरीमधल्या   आवडत्या पात्राशी स्वतःला relate करत मी रमून गेलेली असेन.. बस अजून काय हव? :)
         कधी कधी वाटत की खरच डोळे नीट उघडे ठेवून पाहिलं तर आपल्याला प्रत्येक क्षणी आनंद देणाऱ्या कितीतरी गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात.. पण आपलच लक्ष नसत... आठवड्यातले ५ दिवस ऑफिसमधे सारखा तोच पांढरा डेस्क आणि काळे computer screens पाहिल्यानंतर २ दिवसांच्या हक्काच्या सुट्टीमध्ये colorful निसर्ग पाहायला किती छान वाटत ना? मला तर माझा हरवलेला निसर्ग हळू हळू पुन्हा सापडतोय.. :) आणि तुम्हाला? 




        १०-१५ मिनिटांमध्ये आम्ही कॉटेजमध्ये पोचलो. खूप सुस्ती आली होती. आशिषने मला आधीच TV असलेली रूम चालेल (म्हणजे हवी आहे) असा बुक करताना मला सांगितलं होत. :) मग World Cup match मधे काय सुरु आहे ते जरास पाहिलं. ५ च्या आसपास तयार होऊन आम्ही पुन्हा बीचवर जाण्यासाठी निघालो. आम्हाला Sunset घालवायचा नव्हता. तिथे मी माझी खूप दिवसांची इच्छा पूर्ण केली... ती म्हणजे मी तिथे बीचवर वाळूमध्ये माझं आणि आशिषच नाव लिहिलं. :) आणि वाळूमध्ये काढलेली अजून एक कलाकृती....

                                                   
पाण्यामध्ये बरंच आतमध्ये मला जावसं वाटत होत. पण वेळ जरा भरतीची असल्यामुळे फारस आतमध्ये मी गेले नाही. तिथे बीचवर राईड मारण्यासाठी एक मस्त घोडागाडी होती. काहीजण तिथे मस्त राईड घेत होते. ते पाहून मला एकदम जुन्या हिंदी movie मधले scenes आठवले. :) आम्ही तिथे मनसोक्तपणे sunset चे फोटो काढले. काही मुल तिकडे cricket खेळत होते. लगेच मनात विचार आला की मोठ्ठा group मिळून आलो असतो तर नक्कीच खेळलो असतो इथे... :)   




           आम्ही होळी-रंगपंचमीच्या विकांताला गेलो होतो म्हणून तिथे एक मज्जा पाहायला मिळाली. फिरायला आलेले आणि गावातले लोकसुद्धा कोरडा रंग एकमेकांना लावत होते आणि सरळ समुद्रामध्ये घुसत होते. :) लहानपणी आम्ही कोणाला त्रास द्यायचा असेल तर एक पूर्ण बादलीभरून रंगीत पाणी करायचो आणि त्याच लक्ष नसताना अचानक अंगावर टाकायचो.... पण इथे तर अक्खा समुद्र होता. असाच मनात एक मजेशीर विचार आला की पूर्ण समुद्रच रंगवून टाकला तर? जस की पूर्ण गुलाबी,हिरवा किवा आपल्या आवडत्या रंगाचं समुद्रच पाणी... :)) sunset चे फोटो काढताना खूप मज्जा आली. मी सुर्यासोबत खूप मस्त फोटोस काढले. जस की सूर्याला खाताना... डोक्यावर घेतलेला... हातावर घेतलेलं... बोटांमध्ये पकडलेलं... हळूहळू समुद्र अस्ताला जायला लागला. आणि मग शेवटी पूर्णपणे समुद्रामध्ये बुडून विझला. :)


           मग थोडावेळ आम्ही तिथे निवांत गप्पा मारत बसलो. अंदाजे रात्री ८ च्या आसपास आम्ही कॉटेजमधे परतलो. दुपारी खूप जास्त जेवण झाल्यामुळे आम्हाला फारशी भूक नव्हती. म्हणून मग आम्ही जिथे राहिलो होतो तिथेच असलेल्या काकूंकडे आम्ही फक्त पोहे आणि चहा घेऊ असे सांगितले. रात्री तितकच खाऊन मस्त पोट भरलं. आणि मग सुमुद्राची गाज ऐकता ऐकता कधी डोळा लागला ते कळलच नाही...
           सकाळी लवकर उठून मस्त उपमा आणि सोलकढीचा नाश्ता केला. कॉटेज आम्ही ठरल्याप्रमाणे १० वाजता सोडलं. पुन्हा एकदा बीचजवळून आमच्या कारमधून राईड मारली. समुद्राला मनात साठवून ठेवलं आणि पुन्हा एकदा यायचं असा ठरवून आम्ही दिवेआगरला निरोप दिला. :)
                                                                                                                                                           समाप्त


             खूप दिवस झाले रोजच्या रुटीनचा जाम कंटाळा आला होता. म्हणून कुठेतरी दूर भटकायला जायचं होत...!! मग आम्ही विचार केला ह्या वेळेस दिवेआगरला जाऊया...! खर तर दिवेआगरला पावसाळ्यात नाहीतर हिवाळ्यात जायला पाहिजे म्हणजे तिथे हिरवे निसर्ग सौंदर्य पाहायला मिळते. आता दिवस उन्हाळ्याचे आहेत तरीही आम्ही २ आठवडयाआधी तिकडे जाऊन आलो. "एक बार जो मैने कमीटमेंट देदी तो मै अपने आप की भी नही सुनती.... ही ही :) 
 
शनिवारी सकाळी ६:३० च्या आसपास आम्ही निघालो.  पुण्याहून निघाल्यावर तिथे जाण्यासाठी चांगला रस्ता मुळशी - ताम्हिणी घाट - माणगाव मार्गेच आहे. रस्त्यात पहाटेच्या वेळी असणाऱ्या शांत
वातावरणाचा आस्वाद घेत फोटो काढत आमचा प्रवास सुरु झाला. तिथे आजूबाजूला मस्त डोंगर त्यावर हिरवळ आणि डोंगराच्या मधून घाटाचा मस्त रस्ता... असा वाटत होत जस काही आपल्या आवडीचं एखाद चित्र जिवंत झाल आहे.... 

        
  
 रस्त्यामध्ये सकाळी ८:३० च्या सुमारास आम्ही थोडीशी पेटपूजा करण्यासाठी "शिवराज ढाबा" येथे थांबलो. माणगाव तिथून अंदाजे ३५ ते ४० किमी असेल. तिथला मेनू वाचूनच जाणवलं की आपण कोकणच्या जवळपास आलो आहोत. तिथे जास्त करून मास्यांचा समावेश होता. मेनू मधे डोकावल्यावर मिसळपाव खायचा मूड झाला. पण मिसळ पाव तयार नाहीये म्हटल्यावर आम्ही पोह्यांवर ताव मारला. :) 
        आम्ही ११.१५ च्या जवळपास दिवेआगरला पोचलो. तिथे आम्ही आधीच "श्री शिव समर्थ" इथे एक कॉटेज बुक करून ठेवले होते जे बीचपासून २ मिनिटांच्या अंतरावर आहे. मग त्यांना फोन करून कॉटेजला पोचायचा रस्ता विचारलं. दिवेआगरला समुद्र किनारा असला तरी तिथे हवेत फक्त उकाडा होता पण मुंबईसारखा दमटपणा आणि खारटपणा नव्हता. दिवेआगर तस खूपच छोट गाव आहे. तिथे घरगुती खानावळी पावलोपावली आहेत. पण तिथे १-२ दिवस आधी फोन करून जेवणाची पूर्वकल्पना द्यावी लागते. आम्ही होळीच्या वीकेंडला गेलो होतो म्हणून तिथे जेवणामध्ये गोड पदार्थ पुरणपोळी होती. पण मी फोन करून त्या काकूंना उकडीचे मोदक बनवण्याचा आग्रह केला. :) कारण कोकणात गेल्यावर २ गोष्टी खाण्याचा मोह आवरता येत नाही एक म्हणजे उकडीचे मोदक आणि दुसरं म्हणजे सोलकढी...

             रोजच्या घाईगर्दीच्या रुटीनपेक्षा तिथला शांतपणा खूप हवाहवासा वाटत होता. कॉटेजमधे पोचल्यावर जरास फ्रेश होऊन आम्ही ज्यांच्याकडे जेवायला जाणार होतो त्यांना आम्ही २ पर्यंत जेवायला येऊ असे सांगितले. मला समुद्र पहायची घाई झाली होती. म्हणून जेवायला जायच्या आधीच आम्ही समुद्रावर चक्कर मारायला गेलो. खूप उन असूनही जास्त उकाडा जाणवत नव्हता. तिथे बीचवर जाताना रस्त्यात एक सूचना फलक लावला होता. त्यात सगळ्यात Interesting सूचना होती "कमी व आखूड कपड्यात गावात फिरू नये." ;) ही ही नारळाच्या झाडांमधून वाट काढत काढत आम्ही पोचलो एकदाचे समुद्रावर...  मस्त फोटोस काढणे सुरु झाले. माझ आवडीच काम म्हणजे शिंपले शोधण सुरु झाल... आणि मला तिथे अगदी जवळ असलेले दोन शिंपले सापडले. :) पोटात कावळे ओरडायला लागल्यावर भूक लागल्याच लक्षात आल.. मग आम्ही लगेच निघालो. त्या काकुंच घर मस्त कोकणी पद्धतीच कौलारू होत.. मी आणि आशिष लगेच जेवायला बसलो. जेवणात मऊ मऊ पोळ्या, बटाट्याची आणि भेंडीची भाजी, वरण, गरम गरम भात, पापड आणि उकडीचे मोदक होते. आशिषने उकडीचे मोदक कधीच खाल्ले नव्हते म्हणून त्याला पण उत्सुकता होती. आम्हाला दोघांनाही मोदक खूप आवडले म्हणून २-२ मोदक फस्त केले. गरम गरम मोदक आणि त्यावर घरच तूप.. इतकी मस्त चव माझ्या जिभेवर रेंगाळत आहे. :D त्या काकूंनी अजून आग्रह करून पुरणाची पोळी पण खायला लावली. इतका जेवण झाल होत की उठावस पण वाटत नव्हत... तिथे थोडीशी जरी जागा मिळाली असती ना तर तिथेच झोपलो असतो. :) मग आम्ही ३ च्या सुमारास कॉटेजकडे निघालो.
                                                                                                                                                      क्रमशः
 








भारतीय संघाला आजच्या विश्वचाशकातील अंतिम सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा...!!!




         आज मी खूप दिवसांनी ब्लॉग लिहित आहे. खूप विचार मनात येत राहिले पण ते लिहायला मात्र वेळ मिळाला नाही. नवीन वर्षात मात्र आज मुहूर्त लागला. :) 
       आज मला काहीतरी नवीन गोष्ट तुमच्याशी share करायची आहे. माझ्या ब्लॉग वर "Blog Archive" च्या खाली "तुम्ही इथे भेट दिली आहे का?" ह्या सदराखाली"Snovel" नावाची एक लिंक आहे. त्याबद्दल मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे.       
       आजच्या धकाधकीच्या जगात आपल्याला सगळ्यात जास्त कमतरता जर कुठल्या गोष्टीची भासत असेल तर ती म्हणजे निवांत वेळ. वेळेअभावी आपण अशा अनेक महत्वाच्या गोष्टींना मुकतो ज्यांची मजा एकेकाळी आपण खूप लुटली. कित्येक जणांना आपले छंद जोपासायला सुद्धा वेळ मिळत नाही. त्यातलाच एक छंद म्हणजे वाचन. रोजचं वर्तमानपत्र वाचायला वेळ नसतो तर पुस्तक कसं वाचणार? 
       पण ज्या नव्या युगाने हा प्रश्न निर्माण केला त्यानंच त्याचं उत्तरही दिलं, ते आहे अर्थातच "बोलती पुस्तकं" म्हणजेच आपण त्याला सध्या Audio Books म्हणून ओळखतो. ही Audio Books म्हणजे CDs असतात. English मधे अनेक पुस्तकांचे Audio Books उपलब्ध असतात, पण मराठी भाषेत हा विचार त्यामानाने नवीन आहे (वपु, पुलं आणि अश्या काही नावाजलेल्या लेखकांची कथाकथनं वगळता). Snovel India ह्या कंपनीने Audio Books बनवण्याचे आणि त्यांना बाजारात उपलब्ध करून देण्याचे काम सुरु केले आहे. आजकाल MP3 Players सगळीकडे उपलब्ध असतात, मग त्यांचा असाही वापर करायला काय हरकत आहे. पण ही Audio CD कशी असेल ते पाहायचे असेल तर आपण http://www.snovel.in ह्या लिंकला भेट देऊ शकतो. तिथे "Samples" ह्या tab मधे तीन वेगवेगळ्या पुस्तकांचे काही मिनिटांचे Audio Tracks आहेत. आणि ह्या लिंकवर अजूनही बरीच माहिती मिळू शकते. 
        साऊंड + नॉव्हेल = स्नोवेल अशी ही संकल्पना आहे. त्यामुळे वाचनीय साहित्य आता श्रवणीय होत आहे. आणि ह्या संकल्पनेमुळे जी चांगली पुस्तके काही कारणाने वाचनात नाहीयेत ती सुद्धा रसिक वाचकांपर्यंत पोचतील. रस्त्याने चालताना, बसमध्ये बसल्याबसल्या, काम करताना, किंवा रात्री झोपी जाताना (आठवतं, लहानपणी आजीच्या गोष्टी ऐकत झोपी जायला काय मजा यायची!) आपण जेव्हा पुस्तक ऐकू शकतो, तेव्हा पुस्तक वाचायला वेळ मिळत नाही अशी तक्रार आता नाही करता येणार. आता ह्या Audio CDs म्हणजे लेखनाचं जसं च्या तसं अभिवाचन असावं असा सहज विचार आपल्या मनात येईल...पण तसं न करता, संबंधीत लेखक आणि तज्ञांशी चर्चा करून लेखनात अभ्यासांती अनुकूल बदल घडवून ते श्राव्य-संपूर्ण बनवणं हे स्नॉवेलच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणता येईल. मग त्यासाठी पार्श्वसंगीताचा परिणामकारक प्रयोग असो वा आवश्यकतेनुसार कथेतील पात्रांची केलेली आखणी असो.
        आत्ताच २ महिन्यांपूर्वी डिसेंबरमधे ८४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाणे इथे भरले होते. तिथे स्नोवेलचा पण एक stall होता. आणि तिथे सुद्धा रसिक वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. साहित्य जगतातील मान्यवर लोकांनी पण तिथे भेट दिली आणि हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे आवर्जून सांगितले. स्नोवेलचे आगामी आकर्षण म्हणजे येणारी Audio Books आहेत - कथामोकाशी (दि. बा. मोकाशी), समुद्र (मिलिंद बोकील), सारे प्रवासी घडीचे (जयवंत दळवी) आणि  शितू (गो. नी. दांडेकर).....
         Snovel Media Launch - लोकार्पण सोहळा लवकरच होणार आहे. ह्या कार्यक्रमाला सगळ्या रसिक वाचकांना आणि हा प्रयत्न आवडलेल्या लोकांना आमंत्रण आहे. कार्यक्रमाचे तपशील खाली दिलेले आहेत : 

कार्यक्रम - Snovel Media Launch - लोकार्पण सोहळा
दिवस - १९ फेब्रुवारी, २०११ 
वेळ - सकाळी ११ ते २. 
स्थळ - S.M जोशी सभागृह, "निवारा"च्या समोर, 
          नवी पेठ पुणे. 

तुम्हाला जर हा प्रयत्न आवडला असेल किवा तुम्हाला जर काही अभिप्राय - सुचना द्यायच्या असतील तर तुम्ही snovel.india@gmail.com इथे ईमेल लिहुन संपर्क साधू शकता. आपल्यासारख्यांच्या रसिक वाचकांची उपस्थिती तिथे अपेक्षित आहे. 




दिवाळीची आली पहाट
रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट
उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ
आकाश दिव्यांची झगमगाट

दिवाळीत काही गोष्टी मात्र नित्यनेमाने असतात... पहाटे उठून उटणे लावून केलेले अभ्यंगस्नान... लक्ष्मिपूजनाला केलेली पूजा, पाडवा, भाउबीज... आणि खास म्हणजे...


                     रांगोळी काढलेले स्वागत करणारे घर...


                      मनसोक्त केलेला दिवाळीचा फराळ 


                     फटाक्यांची आतिषबाजी ..!!! 



                     दिव्यांनी उजळून टाकलेले घर..!! 

अश्या ह्या सगळ्यांना नवीन उत्साह देणाऱ्या दिवाळीमुळे तुम्हा सर्वांकडे लक्ष्मीच्या पावलांनी सुख येऊ दे...!! ही दिवाळी तुम्हा सर्वांना खूप खूप आनंदाची - समृद्धीची आणि भरभराटीची जाऊ देत...!!! 

सर्व वाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा...!!! 



         
         अमूल बटर कोणाला माहीत नाही...? आत्तापर्यंतची "Longest Running Ad" आहे ही.. त्यात बटर घेतलेली ती स्वीटशी मुलगी खूप लक्ष वेधून घेते... हातात खूप सार बटर आणि आणि थोडीशी जीभ बाहेर काढलेली :)... मनापासून एन्जॉय करत असते ती... आणि म्हणते .."Utterly Butterly Delicious...!!!" पण सगळ्यात भारी आहे त्यांचे मार्केटिंगची style...  खूप ठिकाणी त्यांच्या adds पाहायला मिळतात. 
        माझं ऑफिस हिंजवडीला आहे. ऑफिसला जाताना वाकड ब्रिज पासून थोडस पुढे  "Naturals Ice - Cream Parlor" आहे. त्याच्या थोडसं अलीकडे एक होर्डिंग आहे. तिथे नेहमी अमूलच पोस्टर असत.. खूप मस्त ads असतात आणि त्या नेहमी बदलत पण असतात ...  एक से एक भारी पोस्टर असतात ती... त्यापैकीच काही ads इथे पोस्ट करत आहे... 







प्रत्येक add मधे खूप छान पंचेस टाकले आहेत. ह्या ads design करणार्याची कल्पकता तर एक नंबर आहे.... आणि आता मला सगळ्यात जास्त आवडलेली add.....




अश्याच ह्या adds येत रहाव्यात... मी तर ह्यांची fan झाली आहे. तुम्ही पण Amul च्या ads इथे contribute करू शकता...   "Amul The Taste of India.....!!!!