दिवाळी हा आपल्याकडे लहान-मोठ्यांपासून सगळ्या धर्मांमध्ये मोठ्या प्रमाणांवर साजरा केला जाणारा सण आहे. आणि मला खास करून दिवाळी खूप आवडते. कारण दिवाळी जवळ आली की काही दिवस आधीपासूनच सगळी तयारी सुरु होते. सगळ्यात आधी सुरुवात होते ते खरेदीची. नवीन ड्रेस, फटाके, रांगोळ्या आणि आकाशकंदील किवां तो बनवायचे सामान वगरे... :)
कोजागिरी पौर्णिमेपासून आपण आकाशकंदील लावतो. लहानपणी आम्ही उत्साहाने घरीच आकाशकंदील बनवत असू. आजकाल मात्र खरच विकत आणण्यामुळे तो बनायची मजा खूप मिस करत आहे मी. रांगोळी काढणे हा एक आवडीचा कार्यक्रम असायचा. दरवर्षी काहीतरी नवीन शक्कल लढवून रांगोळी सजवायचो. कधी फुलांच्या पाकळ्या, कधी चमकी कधी वेगवेगळ्या पणत्या सजवून केलेली सजावट, कधी लाकडाचा भुसा रंगवून तो रांगोळीत भरायचो आणि कधी कधी तर तांदूळ रंगवून ते रांगोळीमध्ये भरायचो.
दिवाळीमध्ये न विसरता येण्यासारखी गोष्ट म्हणजे फराळ. दिवाळीच्या २-३ दिवस आधीपासूनच आई फराळ बनवायला सुरुवात करायची. त्यात असायचे ते चिवडा, लाडू, चकली (माझा सगळ्यात आवडता पदार्थ), शेव, करंजी, शंकरपाळे आणि अनारसे. कितीदा तरी आईला मदत करायच्या बहाण्याने काही पदार्थांना थोडे थोडे खाउन पाहिले आहे. :) हा फराळ आजकाल बाराही महिने बाहेर जरी मिळत असेल तरी दिवाळीच्या दिवसांत ह्या फराळाची चव काही वेगळीच लागते. आणि आईच्या हाताची चव ह्या सगळ्या पदार्थांची लज्जत खूप वाढवते.
दिवाळीच्या पहाटे म्हणजेच नरकचतुर्दशीला लवकर अंघोळ केली नाही तर नरकात जाऊ अशी लहानपणी खूप भीती वाटत असे. :) आणि त्यामुळेच एरव्ही कधी लवकर न उठणारे आम्ही ह्या दिवशी न चुकता लवकर अंघोळ करून घ्यायचो. अभ्यंगस्नान म्हणजे आई आम्हाला अंघोळीच्या आधी ओवाळायची, तेल लावून द्यायची आणि मग मस्त पैकी वासाचे तेल आणि उटणे ह्यासोबत अभ्यंगस्नान पार पडायचे. अजूनही अभ्यंगस्नान असेच पार पडते फक्त आता मी माझ्या सासरी असते. :)
आम्ही दरवर्षी भाऊबीजेसाठी आजोळी जायचो. तिथे मामा - मावशी आणि आम्ही सगळे भावंड खूप मजा करायचो. तिथे आजोबांनी आमच्यासाठी फटाके आधीच आणून ठेवलेले असायचे ते पण एकदम भरभरून... :D अगदी काय उडवू आणि काय नको असा होऊन जायचं. तिथे जो फटाका जरा कमी प्रमाणात असायचा त्याच्यावरूनच सगळ्यांची भांडाभांडी व्हायची. मग कसेतरी करून वाटणी व्हायची आणि थोड्या वेळासाठी शांतता असायची. आणि बच्चेकंपनी म्हणजे आमचे लहान भावंड आमच्याकडून अगदी भांडून फटाके वगरे घायचे पण त्यांना भीती वाटत असल्यामुळे ते उडवण्याची जिम्मेदारी पुन्हा आमच्यावरच यायची. :)
आता ही सगळी मजा जरी आठवणींमध्ये राहिली असली तरी नव्या पद्धतीने आपण दिवाळी साजरी करू शकतो. Eco-Friendly दिवाळी साजरी करण्याची आपल्या पर्यावरणाची गरज आहे. जास्त फटाके न फोडता हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण कमी करण्यात आपण हातभार लावायला हवा. ह्या दिवाळीमध्ये सगळ्या वाईट गोष्टी जाळून जावोत, जुनी भांडणे आणि रुसवे - फुगवे विरून जावोत आणि नव्या इच्छांचा आणि नवीन कल्पनांचा दीप सर्वांच्या मनात अखंड तेवत राहो... सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!!