वाचण्याची आवड असलेल्या प्रत्येक व्यक्तीला दिवाळी अंक वाचण्याच काय सुख असत ते नक्कीच कळेल. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मस्तपैकी फराळाचा आस्वाद घेत दिवाळी अंक वाचत लोळत पडण्यासारख सुख नाही... :) लहान असताना अगदी नेहमीच्या वाचण्यातली पुस्तके म्हणजे "चंपक", "चांदोबा", "ठकठक", "किशोर" आणि "चाचा चौधरी" वगरे. ही सगळी पुस्तके दर महिन्याला तर असायचीच पण दिवाळी अंक असेल तर खूप मोठ्ठा असायचा म्हणून त्याच वेगळं आकर्षण वाटायचं.
आणि आता सुद्धा ह्या पुस्तकांना वाचताना जरी मजा येत असेल तरी पण काही खास दिवाळी अंक वाचल्याशिवाय चैन पडत नाही. काही आवर्जून वाचण्यासारखे म्हणजे माहेर, मेनका, मानिनी, मिळून साऱ्याजणी, दीपलक्ष्मी, नवल, विपुलश्री आणि मौज वगरे.. ह्या सगळ्या अंकामधला मजकूर अगदी दर्जेदार असतो. एक एक अंक असा जो एकदा हातात घेतला की सोडवतच नाही. ह्यामध्ये सामाजिक लेख, उत्तमोत्तम मुलाखती, नवीन सिनेमांची परीक्षणं अश्या कित्येक गोष्टी असतात. प्रत्येक अंकामध्ये पाककृतींचा खजिना आवर्जून असतोच. सगळ्या दिवाळी अंकामध्ये २ गोष्टी नक्की असतात एक म्हणजे दर्जेदार व्यंगचित्रे आणि वार्षिक भविष्य... भविष्य वगरे सारख्या गोष्टीवर विश्वास असो किवा नसो पण उत्सुकतेपोटी एकदा तरी हे भविष्य नजरेखालून घातले जातेच. :)
खूप सारी चांगली मासिके आहेत ज्यांचे दिवाळी अंक अगदी खास असतात. तसेच वेगवेगळ्या वृत्तपत्रांचे सुद्धा दिवाळी अंक दरवर्षी प्रकाशित होतात. ह्या सगळ्यांमध्ये येणारे म्हणजे कालनिर्णय, लोकमत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, सामना, चित्रलेखा, तनिष्का, गृहशोभिका, चारचौघी, श्री व सौ आणि अजून बरेच... चारचौघी मासिकाचे मेहंदी विशेषांक आणि उखाणे विशेषांक हे खूपच खास होते. ज्यांना पोलिसी कथा वाचायला आवडतात त्यांच्यासाठी पोलीस टाईम्स, दक्षता, धनंजय आणि गुन्हेगार हे उकृष्ट दर्जाचे अंक आहेत. ज्यांना विनोदी अंक वाचायला आवडतात त्यांना तर खूप पर्याय उपलब्ध आहेत. जसे की मार्मिक, हसवंती, आवाज, धमाल धमाका, फिरकी, जत्रा, आणि श्यामसुंदर. आवाज आणि जत्रा मासिकांमध्ये मुखपृष्टावर असलेली खट्याळ खिडकी आपल्याला हसवल्याशिवाय राहत नाही. :)वैद्यकशास्त्रावर (मेडिकल) ज्यांना वाचन करायला आवडते ते "शतायुषी" अंक घेतल्याशिवाय रहात नाहीत. ह्यामध्ये वेगवेगळ्या रोगांची सखोल माहिती, त्यावर असलेली एकदम नवीन उपचार पद्धती, डॉक्टरांचे सर्जरीचे अनुभव, रुग्णांचे अनुभव आणि त्यांनी किचकट रोगांशी दिलेला अभूतपूर्व लढा ह्या सगळ्या गोष्टी असतात. दरवर्षी ह्यांचा एका खास रोग किवां उपचार पद्धतीचा विशेषांक असतो.
आजकाल इंटरनेटच्या युगात ज्यांना प्रत्यक्ष पुस्तक वाचायला वेळ नाहीये किवा वाचण्याचा कंटाळा येतो त्यांना ऑनलाईन दिवाळी अंकाचे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत. ह्यापैकी काही ऑनलाईन विकत घ्यावे लागतात तर काही मोफत उपलब्ध असतात. ह्यावर्षी मी ऑनलाईन "हितगुज"(मायबोलीने प्रकाशित केलेला), "मनोगत" आणि "लोकप्रभा" वाचले आहेत. ह्यावर्षीच्या हितगुजच्या अंकात "तंत्र -मैत्र" ह्या सदरात ऑनलाईन कोर्सविषयीची खूप उपयुक्त माहिती आली आहे. ही माहिती https://www.coursera.org/ इथे सापडेल. तसेच कथाविश्व ह्या सदरात खूप छान कथा आहेत. तर मनोगत मध्ये ह्यावर्षी वेगवेळ्या विज्ञानकथांनी हजेरी लावली आहे. तसेच एक "रिक्त" नावाची कौटुंबिक कथा आहे जी मनाला चटका लावून जाते. आणि मनोगतच्या पाककृती विभागात वेगवेगळ्या प्रकारचे आप्पे, वड्या ह्यांनी खास करून हजेरी लावली आहे. तसेच ह्या वर्षी काही नवीन दिवाळी अंक पहिल्यांदा ऑनलाईन आले आहेत जसे की "मिसळपाव" आणि "ऐसी अक्षरे".
असे हे दिवाळी अंक सगळ्या वाचकांसाठी बौद्धिक फराळच आहेत. सगळ्या वाचनप्रेमींनी ह्याचा लाभ घ्यावा ह्यासाठी ही पोस्ट टाकण्याचा खटाटोप केला आहे. :)