Showing posts with label माझे अनुभव. Show all posts
Showing posts with label माझे अनुभव. Show all posts
Australia-Sydney मधे मे ते जून च्या काळात 3 आठवड्यासाठी Vivid Sydney चा festival असतो. वर्षातून एकदा होणारा हा सोहळा Lighting Festival म्हणून ओळखला जातो. ह्यामध्ये Sydney च्या central popular places वर lights project केले जातात.
ही संकल्पना 2009 ला सुरु झाली आणी 2012 ला जास्त famous झाली. 2012 ला 500, 000 पेक्षा जास्त लोक आले आणी जवळपास $ 10 million चा फायदा इथल्या सरकारला झाला. 2013 मधे हेच उत्पन्न $20 million पर्यन्त गेल.
मी ह्या जून मधे हा show Opera house, Harbor lights, The rocks, Circular Quay,  Central Park आणी Darling harbor इथे पाहिला. हा show free of cost असतो. खूप उत्तम तंत्रज्ञान वापरून सगळीकडे रमणीय देखावे तयार करतात. मला सगळ्यात जास्त Opera house आणी Harbor Bridge चे projections आवडले. मी पाहिलेल्या places चे काही फोटो इथे टाकत आहे. ह्या काळात कधी Sydney  ला आलात तर हा सोहळा मिस करु नका.

Circular Quay - Central Park

Circular Quay - Central Park
Circular Quay - Central Park

Circular Quay - Central Park


Circular Quay - Central Park

Circular Quay - Opera House

Harbor Bridge

Harbor Side

Darling Harbor

Darling Harbor





         वाचण्याची आवड असलेल्या प्रत्येक व्यक्तीला दिवाळी अंक वाचण्याच काय सुख असत ते नक्कीच कळेल. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मस्तपैकी फराळाचा आस्वाद घेत दिवाळी अंक वाचत लोळत पडण्यासारख सुख नाही... :) लहान असताना अगदी नेहमीच्या वाचण्यातली पुस्तके म्हणजे "चंपक", "चांदोबा", "ठकठक", "किशोर" आणि "चाचा चौधरी" वगरे. ही सगळी पुस्तके दर महिन्याला तर असायचीच पण दिवाळी अंक असेल तर खूप मोठ्ठा असायचा म्हणून त्याच वेगळं आकर्षण वाटायचं.
         आणि आता सुद्धा ह्या पुस्तकांना वाचताना जरी मजा येत असेल तरी पण काही खास दिवाळी अंक वाचल्याशिवाय चैन पडत नाही. काही आवर्जून वाचण्यासारखे म्हणजे माहेर, मेनका, मानिनी, मिळून साऱ्याजणी, दीपलक्ष्मी, नवल, विपुलश्री आणि मौज वगरे.. ह्या सगळ्या अंकामधला मजकूर अगदी दर्जेदार असतो. एक एक अंक असा जो एकदा हातात घेतला की सोडवतच  नाही. ह्यामध्ये सामाजिक लेख, उत्तमोत्तम मुलाखती, नवीन सिनेमांची परीक्षणं अश्या कित्येक गोष्टी असतात. प्रत्येक अंकामध्ये पाककृतींचा खजिना आवर्जून असतोच.  सगळ्या दिवाळी अंकामध्ये २ गोष्टी नक्की असतात एक म्हणजे दर्जेदार व्यंगचित्रे आणि वार्षिक भविष्य... भविष्य वगरे सारख्या गोष्टीवर विश्वास असो किवा नसो पण उत्सुकतेपोटी एकदा तरी हे भविष्य नजरेखालून घातले जातेच. :) 
          खूप सारी चांगली मासिके आहेत ज्यांचे दिवाळी अंक अगदी खास असतात. तसेच वेगवेगळ्या वृत्तपत्रांचे सुद्धा दिवाळी अंक दरवर्षी प्रकाशित होतात. ह्या सगळ्यांमध्ये येणारे म्हणजे  कालनिर्णय, लोकमत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, सामना, चित्रलेखा, तनिष्का, गृहशोभिका, चारचौघी, श्री व सौ आणि अजून बरेच... चारचौघी मासिकाचे मेहंदी विशेषांक आणि उखाणे विशेषांक हे खूपच खास होते. ज्यांना पोलिसी कथा वाचायला आवडतात त्यांच्यासाठी पोलीस टाईम्स, दक्षता, धनंजय आणि गुन्हेगार हे उकृष्ट दर्जाचे अंक आहेत. ज्यांना विनोदी अंक वाचायला आवडतात त्यांना तर खूप पर्याय उपलब्ध आहेत. जसे की मार्मिक, हसवंती, आवाज, धमाल धमाका, फिरकी, जत्रा, आणि श्यामसुंदर. आवाज आणि जत्रा मासिकांमध्ये मुखपृष्टावर असलेली खट्याळ खिडकी आपल्याला हसवल्याशिवाय राहत नाही. :)
          वैद्यकशास्त्रावर (मेडिकल) ज्यांना वाचन करायला आवडते ते "शतायुषी" अंक घेतल्याशिवाय रहात नाहीत. ह्यामध्ये वेगवेगळ्या रोगांची सखोल माहिती, त्यावर असलेली एकदम नवीन उपचार पद्धती, डॉक्टरांचे सर्जरीचे अनुभव, रुग्णांचे अनुभव आणि त्यांनी किचकट रोगांशी दिलेला अभूतपूर्व लढा ह्या सगळ्या गोष्टी असतात. दरवर्षी ह्यांचा एका खास रोग किवां उपचार पद्धतीचा विशेषांक असतो.
           आजकाल इंटरनेटच्या युगात ज्यांना प्रत्यक्ष पुस्तक वाचायला वेळ नाहीये किवा वाचण्याचा कंटाळा येतो त्यांना ऑनलाईन दिवाळी अंकाचे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत. ह्यापैकी काही ऑनलाईन विकत घ्यावे लागतात तर काही मोफत उपलब्ध असतात.  ह्यावर्षी मी ऑनलाईन "हितगुज"(मायबोलीने प्रकाशित केलेला), "मनोगत" आणि "लोकप्रभा" वाचले आहेत. ह्यावर्षीच्या हितगुजच्या अंकात "तंत्र -मैत्र" ह्या सदरात ऑनलाईन कोर्सविषयीची खूप उपयुक्त माहिती आली आहे. ही माहिती https://www.coursera.org/ इथे सापडेल. तसेच कथाविश्व ह्या सदरात खूप छान कथा आहेत. तर मनोगत मध्ये ह्यावर्षी वेगवेळ्या विज्ञानकथांनी हजेरी लावली आहे. तसेच एक "रिक्त" नावाची कौटुंबिक कथा आहे जी मनाला चटका लावून जाते. आणि मनोगतच्या पाककृती विभागात वेगवेगळ्या प्रकारचे आप्पे, वड्या ह्यांनी खास करून हजेरी लावली आहे. तसेच ह्या वर्षी काही नवीन दिवाळी अंक पहिल्यांदा ऑनलाईन आले आहेत जसे की "मिसळपाव" आणि "ऐसी अक्षरे".
            असे हे दिवाळी अंक सगळ्या वाचकांसाठी बौद्धिक फराळच आहेत. सगळ्या वाचनप्रेमींनी ह्याचा लाभ घ्यावा ह्यासाठी ही पोस्ट टाकण्याचा खटाटोप केला आहे. :)
       






         कोणी कितीही सीरिअलच्या नावाने आरडा ओरडा केला तरीही अश्या खूप कमी व्यक्ती असतील ज्यांनी एकही सीरिअल TV वर पाहिली नसेल.. कौटुंबिक सीरिअल साठी मात्र तमाम पुरुष मंडळीचा अपवाद म्हणता येईल.. पण खर सांगायचं तर आता आपल्या बाबांच्या वयाचे लोक सुद्धा आई लोकांमुळे एखादी सीरिअल तरी (चुकून ?) पाहतातच.. :) हं तर नमनाला घडाभर तेल म्हटल्यासारख मला काय सांगायचं आहे ते राहूनच गेल.. आता माझ्या मनातले काही निरागस प्रश्न मांडणार आहे... :)
       सीरिअलमधली हिरोईन ही नेहमीच खूप सरळसाधी अन्याय सहन वगरे करणारी, घरातल्या व्यक्तींची नको तितकी काळजी घेणारी, जे लोक तिच्याशी खूप वाईट वागतात त्याचं चांगल व्हाव म्हणून देवाला साकड वगरे घालणारीच का असते? त्याचं हे अति चांगल वागणं कधी कधी विचार करायला लावत की ह्यांना काही स्वाभिमान वगरे आहे की नाही? आणि ह्या सगळ्या त्यागाच्या मूर्तींना घरालेच काही लोक वेगवेगळ्या नात्यांच्या रुपात त्रास देत असतात. मजा म्हणजे ह्यांना माहीत असत आपल्याला कोण त्रास देऊ शकत आणि आधी पण त्रास दिलेला आहे तरीपण पुन्हा पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवून ह्या नेहमी का गोत्यात येतात? ह्यांना नॉर्मल लोकांसारखा राग वगरे का येत नाही? ह्यांना कधीच कोणाला धडा शिकवावा वाटतात नाही का?  :) 
          आधी असं होत की हिंदी सीरिअल मधे काहीही चालायचं.. जस की ज्याचं एकमेकांवर प्रेम असेल त्याचं एकमेकांशी लग्न होणार नाही दुसर्या कोणाशीतरी होईल... :) हिरो आणि हिरोईनला सावत्र बहिण किवां भाऊ असलेच पाहिजेत म्हणजे त्यांना त्रास सहजपणे देऊ शकतील. आणि इथे पात्रांचे कितीही वेळा लग्न होऊ शकतात अर्थातच वेगवेगळ्या व्यक्तीसोबत ... :) आणि अजून एक चमत्कारिक गोष्ट म्हणजे एखादा मेलेला व्यक्ती अचानक जिवंत होणं किवां त्याच्यासारखा दिसणारा व्यक्ती परत त्याच कथानकात अवतरणं. हा डिरेक्टरचा फेवरेट ट्विस्ट आहे. :)  आता अतिशयोक्तीची कमाल म्हणजे आणि  medical science ची खिल्ली उडवणारा अजून एक प्रकार म्हणजे कोणत्याही character चा accident झाला की त्याची plastic surgery नक्की होणार. मग ती व्यक्ती नवीन ओळख घेऊन कथानकात येणार आणि स्वतःच्या अन्यायाचा बदला घेणार.. आणि हो plastic surgery झाली की ह्या व्यक्ती बारीक असेल तर जाड किवां जाड असतील तर बारीक होऊ शकतात.. त्यांची संपूर्ण अंगकाठी आणि हेअर स्टाइल वगरे सगळ काही बदलत... भारी आहे बुवा..!! :) आणि आता ह्या सगळ्या गोष्टी मराठी मालिकांमध्ये सर्रासपणे आल्या आहेत. फक्त बदल इतकाच की पात्रांची नाव मराठी आहेत आणि ह्या सिरिअल्समध्ये  सगळे मराठी सण साजरे होतात :) पण ह्या सगळ्या सिरिअल्समध्ये नेहमी वाईटच गोष्टी का चालू असतात? नेहमी कट - कारस्थान का सुरु असतात?  कधी कधी इतक्या सारख्या गोष्टी २-३ मालिकांमध्ये सुरु असतात की पुढे काय होईल ते आपण सहज ओळखू शकतो... खरं सांगायचं तर ह्या सगळ्याचा आता वीट आला आहे.. कुठेही पहा तेच.. पण तरीही नवीन सीरिअल आली कि सगळेजण अशी अपेक्षा करतात कि कदाचित काहीतरी वेगळं असेल.. :)
               म्हणूनच आता सगळ्यांचा मोर्चा Reality Shows कडे वळला आहे. कारण इथे आपल्या काहीतरी knowledge मिळतं जरा मनोरंजन होते. काही खरोखर चांगले Reality Shows आहेत ते म्हणजे KBC, सारेगमप, Cookery Shows, Comedy Shows, Dance Competitions... आणि हो  Rodies  पण.. तितकंच काहीतरी वेगळं पाहायला मिळत त्यात.. पण आता ह्या shows मधे तोचतोचपणा येऊ नये नाहीतर पुन्हा कौटुंबिक सीरिअल मधे अडकलो तर डोक्याचा भुगा व्हायला वेळ लागणार नाही..   



ह्या रोजच्या ऑफिसच्या गडबडीत कधी कधी मला वाटत की मी मान वळवून सुद्धा पहात नाही...  आमच्या घराच्या जवळ इतक्या छान गोष्टी आहेत ज्या मी इतक्या दिवसांमध्ये नीट पहिल्याच नव्हत्या. मागच्या २-३ वीकेंडला मी आमच्या घरासमोरच्या छोट्याश्या बागेत जाऊन आले. खूप मस्त वाटल.. अस वाटल की कितीतरी वर्षांनी मी झाडांना-पानांना-फुलांना इतक्या जवळून पहात आहे.. वेगवेगळ्या फुलांचे वास घेताना एकदम फ्रेश वाटल.. हा वास आपण रोज वापरतो त्या deo आणि perfume पेक्षा कितीतरी रेफ्रेशिंग होता.. :)    
           आमच्या घराच्या gallery मधे आजकाल बरेच जण हजेरी लावतात.. त्यात नेहमी येणारे छोटे पाहुणे म्हणजे साळुंक्या.. चिमण्या आणि कावळे आहेत. कावळा तर रोज सकाळी सकाळी ठरलेल्या वेळेत येतो. तिथे त्याला आधीच खायला ठेवलं असेल तर ठीक आहे नाहीतर आरडाओरडा करून आम्हाला बोलावतो. मग एकदा त्याला खायचं ठेवलेलं दिसलं की त्याच्या ओळखीच्या मंडळींना बोलवून मस्त ब्रेकफास्ट करतो.. एका दिवशी चिमणी तर तिच्या २ छोट्याश्या पायांवर उडी मारत आमच्या hall मधे आली.. :) मला एकदम लहानपणीचे दिवस आठवले जेव्हा मला आई चिऊ - काऊ दाखवत जेवायचे घास भरवायची.... असं म्हणतात की पक्षी ज्या घरात जातात त्या घरात +ve energy असते. संध्याकाळी बागेत झाडांना पाणी घातले होते तेव्हा मला खूप आवडणारा मातीचा वास आला. एखादी आवडणारी गोष्ट अचानक घडल्यावर जस वाटत ना तस वाटल अगदी. 
           माझ्या एकटीची परफेक्ट संध्याकाळ कशी असू शकते माहीत आहे? घराच्या टेरेस मधे मी आमच्या गोलू - मोलू (बीन bags) वर बसलेली असेन. बाहेर मस्त गार वारा सुटलेला असेल. वार्याचा आवाजच इतका आवडेल की कानात गाणे ऐकण्यासाठी headphones पण टाकणार नाही... हातात एखादी मस्त कादंबरी असेल... हातातल्या वाफाळत्या कॉफ्फीची चव घेत मी कादंबरीमधल्या   आवडत्या पात्राशी स्वतःला relate करत मी रमून गेलेली असेन.. बस अजून काय हव? :)
         कधी कधी वाटत की खरच डोळे नीट उघडे ठेवून पाहिलं तर आपल्याला प्रत्येक क्षणी आनंद देणाऱ्या कितीतरी गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात.. पण आपलच लक्ष नसत... आठवड्यातले ५ दिवस ऑफिसमधे सारखा तोच पांढरा डेस्क आणि काळे computer screens पाहिल्यानंतर २ दिवसांच्या हक्काच्या सुट्टीमध्ये colorful निसर्ग पाहायला किती छान वाटत ना? मला तर माझा हरवलेला निसर्ग हळू हळू पुन्हा सापडतोय.. :) आणि तुम्हाला? 




        १०-१५ मिनिटांमध्ये आम्ही कॉटेजमध्ये पोचलो. खूप सुस्ती आली होती. आशिषने मला आधीच TV असलेली रूम चालेल (म्हणजे हवी आहे) असा बुक करताना मला सांगितलं होत. :) मग World Cup match मधे काय सुरु आहे ते जरास पाहिलं. ५ च्या आसपास तयार होऊन आम्ही पुन्हा बीचवर जाण्यासाठी निघालो. आम्हाला Sunset घालवायचा नव्हता. तिथे मी माझी खूप दिवसांची इच्छा पूर्ण केली... ती म्हणजे मी तिथे बीचवर वाळूमध्ये माझं आणि आशिषच नाव लिहिलं. :) आणि वाळूमध्ये काढलेली अजून एक कलाकृती....

                                                   
पाण्यामध्ये बरंच आतमध्ये मला जावसं वाटत होत. पण वेळ जरा भरतीची असल्यामुळे फारस आतमध्ये मी गेले नाही. तिथे बीचवर राईड मारण्यासाठी एक मस्त घोडागाडी होती. काहीजण तिथे मस्त राईड घेत होते. ते पाहून मला एकदम जुन्या हिंदी movie मधले scenes आठवले. :) आम्ही तिथे मनसोक्तपणे sunset चे फोटो काढले. काही मुल तिकडे cricket खेळत होते. लगेच मनात विचार आला की मोठ्ठा group मिळून आलो असतो तर नक्कीच खेळलो असतो इथे... :)   




           आम्ही होळी-रंगपंचमीच्या विकांताला गेलो होतो म्हणून तिथे एक मज्जा पाहायला मिळाली. फिरायला आलेले आणि गावातले लोकसुद्धा कोरडा रंग एकमेकांना लावत होते आणि सरळ समुद्रामध्ये घुसत होते. :) लहानपणी आम्ही कोणाला त्रास द्यायचा असेल तर एक पूर्ण बादलीभरून रंगीत पाणी करायचो आणि त्याच लक्ष नसताना अचानक अंगावर टाकायचो.... पण इथे तर अक्खा समुद्र होता. असाच मनात एक मजेशीर विचार आला की पूर्ण समुद्रच रंगवून टाकला तर? जस की पूर्ण गुलाबी,हिरवा किवा आपल्या आवडत्या रंगाचं समुद्रच पाणी... :)) sunset चे फोटो काढताना खूप मज्जा आली. मी सुर्यासोबत खूप मस्त फोटोस काढले. जस की सूर्याला खाताना... डोक्यावर घेतलेला... हातावर घेतलेलं... बोटांमध्ये पकडलेलं... हळूहळू समुद्र अस्ताला जायला लागला. आणि मग शेवटी पूर्णपणे समुद्रामध्ये बुडून विझला. :)


           मग थोडावेळ आम्ही तिथे निवांत गप्पा मारत बसलो. अंदाजे रात्री ८ च्या आसपास आम्ही कॉटेजमधे परतलो. दुपारी खूप जास्त जेवण झाल्यामुळे आम्हाला फारशी भूक नव्हती. म्हणून मग आम्ही जिथे राहिलो होतो तिथेच असलेल्या काकूंकडे आम्ही फक्त पोहे आणि चहा घेऊ असे सांगितले. रात्री तितकच खाऊन मस्त पोट भरलं. आणि मग सुमुद्राची गाज ऐकता ऐकता कधी डोळा लागला ते कळलच नाही...
           सकाळी लवकर उठून मस्त उपमा आणि सोलकढीचा नाश्ता केला. कॉटेज आम्ही ठरल्याप्रमाणे १० वाजता सोडलं. पुन्हा एकदा बीचजवळून आमच्या कारमधून राईड मारली. समुद्राला मनात साठवून ठेवलं आणि पुन्हा एकदा यायचं असा ठरवून आम्ही दिवेआगरला निरोप दिला. :)
                                                                                                                                                           समाप्त


             खूप दिवस झाले रोजच्या रुटीनचा जाम कंटाळा आला होता. म्हणून कुठेतरी दूर भटकायला जायचं होत...!! मग आम्ही विचार केला ह्या वेळेस दिवेआगरला जाऊया...! खर तर दिवेआगरला पावसाळ्यात नाहीतर हिवाळ्यात जायला पाहिजे म्हणजे तिथे हिरवे निसर्ग सौंदर्य पाहायला मिळते. आता दिवस उन्हाळ्याचे आहेत तरीही आम्ही २ आठवडयाआधी तिकडे जाऊन आलो. "एक बार जो मैने कमीटमेंट देदी तो मै अपने आप की भी नही सुनती.... ही ही :) 
 
शनिवारी सकाळी ६:३० च्या आसपास आम्ही निघालो.  पुण्याहून निघाल्यावर तिथे जाण्यासाठी चांगला रस्ता मुळशी - ताम्हिणी घाट - माणगाव मार्गेच आहे. रस्त्यात पहाटेच्या वेळी असणाऱ्या शांत
वातावरणाचा आस्वाद घेत फोटो काढत आमचा प्रवास सुरु झाला. तिथे आजूबाजूला मस्त डोंगर त्यावर हिरवळ आणि डोंगराच्या मधून घाटाचा मस्त रस्ता... असा वाटत होत जस काही आपल्या आवडीचं एखाद चित्र जिवंत झाल आहे.... 

        
  
 रस्त्यामध्ये सकाळी ८:३० च्या सुमारास आम्ही थोडीशी पेटपूजा करण्यासाठी "शिवराज ढाबा" येथे थांबलो. माणगाव तिथून अंदाजे ३५ ते ४० किमी असेल. तिथला मेनू वाचूनच जाणवलं की आपण कोकणच्या जवळपास आलो आहोत. तिथे जास्त करून मास्यांचा समावेश होता. मेनू मधे डोकावल्यावर मिसळपाव खायचा मूड झाला. पण मिसळ पाव तयार नाहीये म्हटल्यावर आम्ही पोह्यांवर ताव मारला. :) 
        आम्ही ११.१५ च्या जवळपास दिवेआगरला पोचलो. तिथे आम्ही आधीच "श्री शिव समर्थ" इथे एक कॉटेज बुक करून ठेवले होते जे बीचपासून २ मिनिटांच्या अंतरावर आहे. मग त्यांना फोन करून कॉटेजला पोचायचा रस्ता विचारलं. दिवेआगरला समुद्र किनारा असला तरी तिथे हवेत फक्त उकाडा होता पण मुंबईसारखा दमटपणा आणि खारटपणा नव्हता. दिवेआगर तस खूपच छोट गाव आहे. तिथे घरगुती खानावळी पावलोपावली आहेत. पण तिथे १-२ दिवस आधी फोन करून जेवणाची पूर्वकल्पना द्यावी लागते. आम्ही होळीच्या वीकेंडला गेलो होतो म्हणून तिथे जेवणामध्ये गोड पदार्थ पुरणपोळी होती. पण मी फोन करून त्या काकूंना उकडीचे मोदक बनवण्याचा आग्रह केला. :) कारण कोकणात गेल्यावर २ गोष्टी खाण्याचा मोह आवरता येत नाही एक म्हणजे उकडीचे मोदक आणि दुसरं म्हणजे सोलकढी...

             रोजच्या घाईगर्दीच्या रुटीनपेक्षा तिथला शांतपणा खूप हवाहवासा वाटत होता. कॉटेजमधे पोचल्यावर जरास फ्रेश होऊन आम्ही ज्यांच्याकडे जेवायला जाणार होतो त्यांना आम्ही २ पर्यंत जेवायला येऊ असे सांगितले. मला समुद्र पहायची घाई झाली होती. म्हणून जेवायला जायच्या आधीच आम्ही समुद्रावर चक्कर मारायला गेलो. खूप उन असूनही जास्त उकाडा जाणवत नव्हता. तिथे बीचवर जाताना रस्त्यात एक सूचना फलक लावला होता. त्यात सगळ्यात Interesting सूचना होती "कमी व आखूड कपड्यात गावात फिरू नये." ;) ही ही नारळाच्या झाडांमधून वाट काढत काढत आम्ही पोचलो एकदाचे समुद्रावर...  मस्त फोटोस काढणे सुरु झाले. माझ आवडीच काम म्हणजे शिंपले शोधण सुरु झाल... आणि मला तिथे अगदी जवळ असलेले दोन शिंपले सापडले. :) पोटात कावळे ओरडायला लागल्यावर भूक लागल्याच लक्षात आल.. मग आम्ही लगेच निघालो. त्या काकुंच घर मस्त कोकणी पद्धतीच कौलारू होत.. मी आणि आशिष लगेच जेवायला बसलो. जेवणात मऊ मऊ पोळ्या, बटाट्याची आणि भेंडीची भाजी, वरण, गरम गरम भात, पापड आणि उकडीचे मोदक होते. आशिषने उकडीचे मोदक कधीच खाल्ले नव्हते म्हणून त्याला पण उत्सुकता होती. आम्हाला दोघांनाही मोदक खूप आवडले म्हणून २-२ मोदक फस्त केले. गरम गरम मोदक आणि त्यावर घरच तूप.. इतकी मस्त चव माझ्या जिभेवर रेंगाळत आहे. :D त्या काकूंनी अजून आग्रह करून पुरणाची पोळी पण खायला लावली. इतका जेवण झाल होत की उठावस पण वाटत नव्हत... तिथे थोडीशी जरी जागा मिळाली असती ना तर तिथेच झोपलो असतो. :) मग आम्ही ३ च्या सुमारास कॉटेजकडे निघालो.
                                                                                                                                                      क्रमशः
 




            मला अजूनही आठवतात लहानपणीचे दिवस... तेव्हा काही कळत नसायचं पण सगळ्या गोष्टींच कुतुहूल असायचं... खूप छोट्या छोट्या गोष्टींमुळे आनंद मिळायचा तेव्हा...  सरांनी सगळ्या वर्गासमोर कौतुक केल की होणारा आनंद....  मित्र मैत्रिणींसोबत मनसोक्त खेळायला मिळाल्याचा आनंद... आईने डब्यात आवडीच काही दिले असेल की होणारा आनंद... कधी कधी अचानक सुट्टी मिळाली की विचारायलाच नको... आणि सगळ्यात जास्त आम्ही वाट पहायचो ते दिवाळीच्या सुट्ट्याची... महिनाभर आधीपासून सुट्टीचे बेत आखले जायचे... ह्या गोष्टी आयुष्यातला न विसरता येणारा काळ आहे .... 
         उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही सगळे म्हणजे माझे सगळे मावस अणि मामे भावंड धरून एकूण ८-१० जण आजोळी जमायचो आणि खूप धमाल करायचो. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत तर खाण्याची चंगळ असायची... आजोबा तर आंब्याची मोठ्ठी टोकरी आणून ठेवायचे... सकाळी उठल्यापासून आंब्यावर ताव मारणे सुरु होत असे. मग जेवायला वेळ असेल तर काहीतरी हलका फुलका नाश्ता पुन्हा होत असे. मग आज्जी आणि सगळ्याच्या आई अंघोळ करून घ्या म्हणून मागे लागत असत. शेवटी नाईलाजाने का होईना सगळे अंघोळी करून घ्यायचे. मग सगळ्यांची पंगत बसायची जेवायला. गप्पा मारत आणि मस्ती करत जेवण कधी संपायचे ते कळायचे पण नाही... प्रत्येक जण आज्जीकडे रोज नवी फर्माईश करायचा. आज्जी पण प्रत्येकासाठी आवडीने सगळ बनवायची. नन्तर आमचे खेळ सुरु व्हायचे. दुपारची वेळ असल्यामुळे एकतर सावलीत खेळावे लागायचे किवा मग बैठे खेळ खेळायचो....जस की व्यापार, पत्ते, कॅरम, सापशिडी.. व्यापार तर इतका वेळ चालायचं की बस... जेव्हा तिथे इखादी जागा विकत घ्यायचो किवा त्या जागेवर घर बांधायचो तेव्हा ते सगळ खर असल्याचा फील यायचा. त्यामध्ये असणाऱ्या खोट्या कागदी नोटांना पण खूप जीवापाड जपायचो... :)
          आजोबांकडे मोठ्ठी बाग असल्यामुळे झाडांना पाणी घालायचं एक काम असायचं. हे काम मात्र आलटून पालटून मिळायचा सगळ्यांना आणि मज्जा म्हणजे "मी पाणी घालणार झाडांना" ह्यावरून वाद व्हायचे सगळ्याचे.. कारण इतका राजरोसपणे पाण्यात खेळायचा चान्स कोणालाही सोडायचा नसायचा.. सुट्टीतला अजून एक नियम म्हणजे मंदिरात जाण... आजोबांच्या घरापासून जवळच दत्ताच एक मंदिर होत.. दिवसातून एकदा तरी आम्ही जायचो..  जाताना आम्ही बागेतली फुलं तोडून आज्जीने दिलेल्या परडीमधे ठेवायचो. मग तिथे जाऊन स्तोत्र म्हणणे आणि देवाला प्रदक्षिणा घालणे झाले की थोडावेळ तिथे गप्पा मारणे किवा खेळणे व्हायचे.  परत आल्यावर थोडावेळ टिव्ही पाहणे ... उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एक खूप मोठा आकर्षण म्हणजे दारावर येणारी कुल्फी...  दारावरचे कुल्फीवाले काका न चुकता रोज यायचे आणि आमचा सुद्धा रोज कुल्फी खाण्याचा अलिखित नियम झाला होता. आम्ही अंदाजे ८ ते १० जण बच्चे कंपनी होतो. आणि ह्या कुल्फीच्या मेजवानीमध्ये कधी कधी मोठे लोक पण असायचे. 
         मग संध्याकाळी आम्ही सगळे जण देवासमोर बसून शुभंकरोती आणि पाढे म्हणायचो. नंतर  अंगणामध्ये आम्ही हलकंसं पाणी शिंपडायचो. थोडसं गार झाल की आमची रात्रीची जेवणाची पंगत तिथेच असायची. सगळ तिथे आणून ठेवणं आणि नंतर परत ठेवण आमच लहान मुलाचं काम असायचं. आम्ही सगळेजण हे काम खूप आनंदाने करायचो. ह्या सुट्ट्यांच्या दिवसात आवडीच्या पदार्थांसोबत सगळ्यात जास्त आम्हाला आवडणार्या गोष्टी म्हणजे .. आज्जीच्या हातच आंबटवरण, थंडगार ताक, घरच मस्त लोणचं (आंब्याच, लिम्बाच जे हव ते), कच्च्या कैरीचा तक्कू, salad - कांद्याची पात, मेथीला तिखट आणि मीठ लावून केलेला घोळाणा.... आणि ह्या सगळ्या गोष्टींची चवच अशी होती की पोट भरलं तरी मन भरायचं नाही...
          रात्री झोपायच्या काही तास आधी आम्ही गच्चीवर पण पाणी टाकून ठेवायचो कारण दिवसभर गच्ची उन्हाने खूप तापलेली असायची. मग तिथल पाणी सुकल की आम्ही तिथे गाद्या वगरे टाकून झोपायची तयारी करायचो.. पण लवकर झोपणार्यांपैकी  कोणीही नव्हते. मग आमचा तो वेळ गोष्टी सांगण्याचा असायचा... त्या पण भुतांच्या... मग मधेच काही जणांना भीती वाटायची आणि आईची आठवण यायची... :)  मग घरच्यांचा खूप ओरडा खाल्यावर कसेबसे आम्ही झोपायचो.  तिथे सुद्धा आमच्या जागा ठरलेल्या असायच्या. आणि आमची झोपण्याची रजई पण ठरलेली असायची... मग आज्जीच्या जवळ कोण झोपणार ह्याचे पण नंबर असायचे... हे सगळ नंबर वगरे फक्त भांडण होऊ नये म्हणून... खरच  काय पण ते दिवस होते... ह्या सगळ्या गोष्टींमध्ये महिना कसा निघून जायचा हे कळायचंच नाही...
          या सुट्ट्या मी अजूनही खूप मिस करते... आता हे दिवस फक्त आठवणीमधेच उरले आहेत. ह्या सुट्ट्या म्हणजे आमच्यासाठी वर्षभराच टोनिक होत. पण  आता कित्येक वर्ष झाली आहेत अश्या सुट्ट्या मी घालवल्या नाहीत. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींना enjoy करणं कुठेतरी हरवलं आहे अस वाटत... पण कितीही वर्ष उलटली तरी ही आठवणींची शिदोरी मात्र नेहमीच सोबत असते. त्यामुळे आठवणींचा कप्पा हळूच उघडायचा आणि हवं ते पान वाचायचं.. ह्या busy life मधे refresh होण्यासाठी अजून कोणता चांगला मार्ग असेल? :)



    
       
               मॅच delay झाल्यामुळे आम्ही जरासे गोंधळून गेलो. काय झाले ते कळत नव्हते. मग लगेच सगळ्याना फोन करून विचारत होतो की काय झाले आहे? News channels तर नक्कीच काहीतरी सांगत असतील.... तेव्हा सगळ्याना SMS येत होते आणि कळाले की stadium च्या बाहेर 2 ब्लास्ट झाले आहेत. मग लगेच घरच्यांचे आणि friends चे फोन येणे सुरू झाले की आम्ही सुखरूप आहोत की नाही ..... काय सुरू आहे इकडे? आम्हाला मधे काहीच कळत नव्हते आणि काही धोका पण नव्हता. कारण इथे सुरक्षा खूप कडक होती. आम्हाला वाटला की आता मॅच cancel झाला तर? सगळे पैसे आणि मेहनत पाण्यात आणि मूडची पण वाट लागेल. पण नंतर कळले की मॅच 1 तास उशीरा सुरू होणार आहे. हे कळल्यावर मग आमचा जीव भांड्यात पडला. :)
           हे सगळे गोंधळ सुरू असताना माझे निरीक्षण चालू होते आजूबाजूला..... पूर्ण stadium माणसानी भरून वाहत होते. सगळ्यांसोबत आम्ही पण मॅचचा माहोल आणि प्रचंड गर्दीची मजा घेत होतो. मॅच सुरू व्हायच्या आधी खेळाडूंचा ground वर सुरू असणारा सराव पण पाहायला मिळाला. थोड्याच वेळात (IPL च्या बरोबरीने प्रसिद्धी मिळालेल्या) दोन्ही teams च्या CHEER GIRLS ची entry  झाली. सगळ्या प्रेक्षकानी त्यांचे जोरदार स्वागत केले. मला पण त्यांना जवळून पाहायची इच्छा होतीच... :)   खरच त्या सही होत्या...!!! :D
          आणि एकदाचा मॅच सुरू झाला. इतके लोक आणि इतका उत्साह बघून लगेच कळत की आपल्या देशात क्रिकेट इतका का favorite game आहे ते.. :) Live मॅच पाहण्याची मजाच काही वेगळी असते. कधी कधी विश्वास बसत नाही की आपले आवडीचे players तिथे आपल्या डोळ्यासमोर खेळत आहेत. MI ची batting पहिल्यांदा होती. सगळेच सचिन च्या खेळीकडे डोळे लाऊन बसले होते. पण सचिन ह्या मॅच मधे लवकर आउट झाला त्यामुळे जरासा मूड गेला. पण बाकीच्यांनी चांगली खेळी केल्यामुळे  एकूणच MI ची धावसंख्या जबरदस्त झाली होती. चांगल्या चौकारांमुळे आणि षट्कारांमुळे सगळे stadium दनाणून गेले होते. RCB  ने सुद्धा चांगली खेळी करायचा प्रयत्न केला पण  एकामागोमाग एक सगळे आउट होत गेले आणि MI चांगल्या फरकाने हा मैच जिंकले.
          हा शनिवार मनसोक्त enjoy करून आम्ही बाहेर पडलो. घरी जाताना तूफ़ान पाऊस होता. तसेच भिजत भिजत घरी गेलो. घरी पोचायला जवळपास 9.30 वाजले होते. दिवसभर इतक थकूनही काहीच थकवा जाणवत नव्हता. आणि असा आमचा  शनिवार काहीही ठरवलेला नसताना IPLमय झाला. :)
अरे हो माझ्याकडून "Mumbai Indians" ला final मॅच साठी भरभरून शुभेच्छा...!!!


   
              
              सध्या सगळीकडे IPL चे वारे वाहत आहे. आणि आशिषला मॅच तुफान आवडत असल्यामुळे आमच्याकडे सुद्धा मॅच पाहिला नाही  असा एकही दिवस जात नाही. मी फक्त 2  Teams ना मनापासून support करते.... "Mumbai Indians" आणि "Royal Challengers Bangalore (RCB)" (बंगलोरला रहात असल्यामुळे करत असेन कदाचित  :) ) IPL चा live मॅच बघण्याची आमची खूप इच्छा होती. म्हटला की शनिवारचा 17 एप्रिलचा मॅच  बघावा कारण तो MI आणि RCB मधे होता... तो पण बंगलोर मधे..... पण लवकर tickets book  न केल्यामुळे मॅच बघण्याचा विचार आम्ही सोडून दिला होता.
           अचानक गुरुवारी आशिष म्हणाला की त्याच्या काही friends ना पण हा मॅच पाहायचा आहे... tickets कोणाकडेच नाहीयेत.... आपण जाऊन तर पाहूया कुठून tickets मिळवता आली तर मॅच पाहू नाहीतर येऊ घरी....
           मग शनिवारी सकाळी आम्ही नाश्ता केला. पटकन काही महत्वाची काम करून stadium कडे निघालो. रस्त्यात आमच्यासोबत मॅच पाहायला येणारा friend पण आम्हाला join झाला. आणि एकजण तिकडे पोचला होता आणि आमची वाट पाहत होता.  आशिषकडे असणारा RCB चा T-Shirt आम्ही सोबत बॅग मधे घेतला होताच.... (अरे हो आशिषच्या supporting list  मधे आधी RCB आणि नंतर MI आहे. ) मी  MI ला support करत असल्यामुळे मला  MI चा T-Shirt हवा होता. पण असे ठरवले की tickets  मिळाले तर घेऊ. मॅच ची वेळ 4 वाजताची होती. पण tickets मिळवायचे असल्यामुळे आम्ही दुपारी 12 वाजताच बाहेर पडलो होतो.
           आणि शेवटी काहीतरी करून (समझनेवाले को इशारा काफी है ) :) tickets मिळवले एकदाचे...... !!! इतका आनंद झाला तेव्हा की बस... जग जिंकल्यासारखे भाव होते चेहर्यावर...... मग लगेच ठरल्याप्रमाणे माझ्यासाठी MI चा T-Shirt घेतला. आणि अशी सगळी जय्यत तयारी करून आम्ही 3 वाजता मधे पोचलो. मग लगेच घरी दोघांच्याही आई बाबाना फोन करून आम्ही इथे आल्याचे सांगितले. (कारण तोपर्यंत कोणालाच सांगितले नव्हते.) मग सगळ्या friends ना पण ही आम्ही इथे असल्याचे कळवले. पण सगळा मनासारख कस घडेल ना? थोड्याच वेळात ground वरती board झळकत होता.. "MATCH DELAYED ". :(

क्रमश: