कोणी कितीही सीरिअलच्या नावाने आरडा ओरडा केला तरीही अश्या खूप कमी व्यक्ती असतील ज्यांनी एकही सीरिअल TV वर पाहिली नसेल.. कौटुंबिक सीरिअल साठी मात्र तमाम पुरुष मंडळीचा अपवाद म्हणता येईल.. पण खर सांगायचं तर आता आपल्या बाबांच्या वयाचे लोक सुद्धा आई लोकांमुळे एखादी सीरिअल तरी (चुकून ?) पाहतातच.. :) हं तर नमनाला घडाभर तेल म्हटल्यासारख मला काय सांगायचं आहे ते राहूनच गेल.. आता माझ्या मनातले काही निरागस प्रश्न मांडणार आहे... :)
       सीरिअलमधली हिरोईन ही नेहमीच खूप सरळसाधी अन्याय सहन वगरे करणारी, घरातल्या व्यक्तींची नको तितकी काळजी घेणारी, जे लोक तिच्याशी खूप वाईट वागतात त्याचं चांगल व्हाव म्हणून देवाला साकड वगरे घालणारीच का असते? त्याचं हे अति चांगल वागणं कधी कधी विचार करायला लावत की ह्यांना काही स्वाभिमान वगरे आहे की नाही? आणि ह्या सगळ्या त्यागाच्या मूर्तींना घरालेच काही लोक वेगवेगळ्या नात्यांच्या रुपात त्रास देत असतात. मजा म्हणजे ह्यांना माहीत असत आपल्याला कोण त्रास देऊ शकत आणि आधी पण त्रास दिलेला आहे तरीपण पुन्हा पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवून ह्या नेहमी का गोत्यात येतात? ह्यांना नॉर्मल लोकांसारखा राग वगरे का येत नाही? ह्यांना कधीच कोणाला धडा शिकवावा वाटतात नाही का?  :) 
          आधी असं होत की हिंदी सीरिअल मधे काहीही चालायचं.. जस की ज्याचं एकमेकांवर प्रेम असेल त्याचं एकमेकांशी लग्न होणार नाही दुसर्या कोणाशीतरी होईल... :) हिरो आणि हिरोईनला सावत्र बहिण किवां भाऊ असलेच पाहिजेत म्हणजे त्यांना त्रास सहजपणे देऊ शकतील. आणि इथे पात्रांचे कितीही वेळा लग्न होऊ शकतात अर्थातच वेगवेगळ्या व्यक्तीसोबत ... :) आणि अजून एक चमत्कारिक गोष्ट म्हणजे एखादा मेलेला व्यक्ती अचानक जिवंत होणं किवां त्याच्यासारखा दिसणारा व्यक्ती परत त्याच कथानकात अवतरणं. हा डिरेक्टरचा फेवरेट ट्विस्ट आहे. :)  आता अतिशयोक्तीची कमाल म्हणजे आणि  medical science ची खिल्ली उडवणारा अजून एक प्रकार म्हणजे कोणत्याही character चा accident झाला की त्याची plastic surgery नक्की होणार. मग ती व्यक्ती नवीन ओळख घेऊन कथानकात येणार आणि स्वतःच्या अन्यायाचा बदला घेणार.. आणि हो plastic surgery झाली की ह्या व्यक्ती बारीक असेल तर जाड किवां जाड असतील तर बारीक होऊ शकतात.. त्यांची संपूर्ण अंगकाठी आणि हेअर स्टाइल वगरे सगळ काही बदलत... भारी आहे बुवा..!! :) आणि आता ह्या सगळ्या गोष्टी मराठी मालिकांमध्ये सर्रासपणे आल्या आहेत. फक्त बदल इतकाच की पात्रांची नाव मराठी आहेत आणि ह्या सिरिअल्समध्ये  सगळे मराठी सण साजरे होतात :) पण ह्या सगळ्या सिरिअल्समध्ये नेहमी वाईटच गोष्टी का चालू असतात? नेहमी कट - कारस्थान का सुरु असतात?  कधी कधी इतक्या सारख्या गोष्टी २-३ मालिकांमध्ये सुरु असतात की पुढे काय होईल ते आपण सहज ओळखू शकतो... खरं सांगायचं तर ह्या सगळ्याचा आता वीट आला आहे.. कुठेही पहा तेच.. पण तरीही नवीन सीरिअल आली कि सगळेजण अशी अपेक्षा करतात कि कदाचित काहीतरी वेगळं असेल.. :)
               म्हणूनच आता सगळ्यांचा मोर्चा Reality Shows कडे वळला आहे. कारण इथे आपल्या काहीतरी knowledge मिळतं जरा मनोरंजन होते. काही खरोखर चांगले Reality Shows आहेत ते म्हणजे KBC, सारेगमप, Cookery Shows, Comedy Shows, Dance Competitions... आणि हो  Rodies  पण.. तितकंच काहीतरी वेगळं पाहायला मिळत त्यात.. पण आता ह्या shows मधे तोचतोचपणा येऊ नये नाहीतर पुन्हा कौटुंबिक सीरिअल मधे अडकलो तर डोक्याचा भुगा व्हायला वेळ लागणार नाही..   






आनंद घेऊन आला हा "दसरा" सोने लुटून करूया साजरा..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी इच्छा... सोन्याहून अनमोल अश्या माझ्या शुभेच्छा...!!!


माझ्या ब्लॉगच्या सगळ्या वाचकांना आणि पाहुण्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा.. :)




ह्या रोजच्या ऑफिसच्या गडबडीत कधी कधी मला वाटत की मी मान वळवून सुद्धा पहात नाही...  आमच्या घराच्या जवळ इतक्या छान गोष्टी आहेत ज्या मी इतक्या दिवसांमध्ये नीट पहिल्याच नव्हत्या. मागच्या २-३ वीकेंडला मी आमच्या घरासमोरच्या छोट्याश्या बागेत जाऊन आले. खूप मस्त वाटल.. अस वाटल की कितीतरी वर्षांनी मी झाडांना-पानांना-फुलांना इतक्या जवळून पहात आहे.. वेगवेगळ्या फुलांचे वास घेताना एकदम फ्रेश वाटल.. हा वास आपण रोज वापरतो त्या deo आणि perfume पेक्षा कितीतरी रेफ्रेशिंग होता.. :)    
           आमच्या घराच्या gallery मधे आजकाल बरेच जण हजेरी लावतात.. त्यात नेहमी येणारे छोटे पाहुणे म्हणजे साळुंक्या.. चिमण्या आणि कावळे आहेत. कावळा तर रोज सकाळी सकाळी ठरलेल्या वेळेत येतो. तिथे त्याला आधीच खायला ठेवलं असेल तर ठीक आहे नाहीतर आरडाओरडा करून आम्हाला बोलावतो. मग एकदा त्याला खायचं ठेवलेलं दिसलं की त्याच्या ओळखीच्या मंडळींना बोलवून मस्त ब्रेकफास्ट करतो.. एका दिवशी चिमणी तर तिच्या २ छोट्याश्या पायांवर उडी मारत आमच्या hall मधे आली.. :) मला एकदम लहानपणीचे दिवस आठवले जेव्हा मला आई चिऊ - काऊ दाखवत जेवायचे घास भरवायची.... असं म्हणतात की पक्षी ज्या घरात जातात त्या घरात +ve energy असते. संध्याकाळी बागेत झाडांना पाणी घातले होते तेव्हा मला खूप आवडणारा मातीचा वास आला. एखादी आवडणारी गोष्ट अचानक घडल्यावर जस वाटत ना तस वाटल अगदी. 
           माझ्या एकटीची परफेक्ट संध्याकाळ कशी असू शकते माहीत आहे? घराच्या टेरेस मधे मी आमच्या गोलू - मोलू (बीन bags) वर बसलेली असेन. बाहेर मस्त गार वारा सुटलेला असेल. वार्याचा आवाजच इतका आवडेल की कानात गाणे ऐकण्यासाठी headphones पण टाकणार नाही... हातात एखादी मस्त कादंबरी असेल... हातातल्या वाफाळत्या कॉफ्फीची चव घेत मी कादंबरीमधल्या   आवडत्या पात्राशी स्वतःला relate करत मी रमून गेलेली असेन.. बस अजून काय हव? :)
         कधी कधी वाटत की खरच डोळे नीट उघडे ठेवून पाहिलं तर आपल्याला प्रत्येक क्षणी आनंद देणाऱ्या कितीतरी गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात.. पण आपलच लक्ष नसत... आठवड्यातले ५ दिवस ऑफिसमधे सारखा तोच पांढरा डेस्क आणि काळे computer screens पाहिल्यानंतर २ दिवसांच्या हक्काच्या सुट्टीमध्ये colorful निसर्ग पाहायला किती छान वाटत ना? मला तर माझा हरवलेला निसर्ग हळू हळू पुन्हा सापडतोय.. :) आणि तुम्हाला? 




        १०-१५ मिनिटांमध्ये आम्ही कॉटेजमध्ये पोचलो. खूप सुस्ती आली होती. आशिषने मला आधीच TV असलेली रूम चालेल (म्हणजे हवी आहे) असा बुक करताना मला सांगितलं होत. :) मग World Cup match मधे काय सुरु आहे ते जरास पाहिलं. ५ च्या आसपास तयार होऊन आम्ही पुन्हा बीचवर जाण्यासाठी निघालो. आम्हाला Sunset घालवायचा नव्हता. तिथे मी माझी खूप दिवसांची इच्छा पूर्ण केली... ती म्हणजे मी तिथे बीचवर वाळूमध्ये माझं आणि आशिषच नाव लिहिलं. :) आणि वाळूमध्ये काढलेली अजून एक कलाकृती....

                                                   
पाण्यामध्ये बरंच आतमध्ये मला जावसं वाटत होत. पण वेळ जरा भरतीची असल्यामुळे फारस आतमध्ये मी गेले नाही. तिथे बीचवर राईड मारण्यासाठी एक मस्त घोडागाडी होती. काहीजण तिथे मस्त राईड घेत होते. ते पाहून मला एकदम जुन्या हिंदी movie मधले scenes आठवले. :) आम्ही तिथे मनसोक्तपणे sunset चे फोटो काढले. काही मुल तिकडे cricket खेळत होते. लगेच मनात विचार आला की मोठ्ठा group मिळून आलो असतो तर नक्कीच खेळलो असतो इथे... :)   




           आम्ही होळी-रंगपंचमीच्या विकांताला गेलो होतो म्हणून तिथे एक मज्जा पाहायला मिळाली. फिरायला आलेले आणि गावातले लोकसुद्धा कोरडा रंग एकमेकांना लावत होते आणि सरळ समुद्रामध्ये घुसत होते. :) लहानपणी आम्ही कोणाला त्रास द्यायचा असेल तर एक पूर्ण बादलीभरून रंगीत पाणी करायचो आणि त्याच लक्ष नसताना अचानक अंगावर टाकायचो.... पण इथे तर अक्खा समुद्र होता. असाच मनात एक मजेशीर विचार आला की पूर्ण समुद्रच रंगवून टाकला तर? जस की पूर्ण गुलाबी,हिरवा किवा आपल्या आवडत्या रंगाचं समुद्रच पाणी... :)) sunset चे फोटो काढताना खूप मज्जा आली. मी सुर्यासोबत खूप मस्त फोटोस काढले. जस की सूर्याला खाताना... डोक्यावर घेतलेला... हातावर घेतलेलं... बोटांमध्ये पकडलेलं... हळूहळू समुद्र अस्ताला जायला लागला. आणि मग शेवटी पूर्णपणे समुद्रामध्ये बुडून विझला. :)


           मग थोडावेळ आम्ही तिथे निवांत गप्पा मारत बसलो. अंदाजे रात्री ८ च्या आसपास आम्ही कॉटेजमधे परतलो. दुपारी खूप जास्त जेवण झाल्यामुळे आम्हाला फारशी भूक नव्हती. म्हणून मग आम्ही जिथे राहिलो होतो तिथेच असलेल्या काकूंकडे आम्ही फक्त पोहे आणि चहा घेऊ असे सांगितले. रात्री तितकच खाऊन मस्त पोट भरलं. आणि मग सुमुद्राची गाज ऐकता ऐकता कधी डोळा लागला ते कळलच नाही...
           सकाळी लवकर उठून मस्त उपमा आणि सोलकढीचा नाश्ता केला. कॉटेज आम्ही ठरल्याप्रमाणे १० वाजता सोडलं. पुन्हा एकदा बीचजवळून आमच्या कारमधून राईड मारली. समुद्राला मनात साठवून ठेवलं आणि पुन्हा एकदा यायचं असा ठरवून आम्ही दिवेआगरला निरोप दिला. :)
                                                                                                                                                           समाप्त


             खूप दिवस झाले रोजच्या रुटीनचा जाम कंटाळा आला होता. म्हणून कुठेतरी दूर भटकायला जायचं होत...!! मग आम्ही विचार केला ह्या वेळेस दिवेआगरला जाऊया...! खर तर दिवेआगरला पावसाळ्यात नाहीतर हिवाळ्यात जायला पाहिजे म्हणजे तिथे हिरवे निसर्ग सौंदर्य पाहायला मिळते. आता दिवस उन्हाळ्याचे आहेत तरीही आम्ही २ आठवडयाआधी तिकडे जाऊन आलो. "एक बार जो मैने कमीटमेंट देदी तो मै अपने आप की भी नही सुनती.... ही ही :) 
 
शनिवारी सकाळी ६:३० च्या आसपास आम्ही निघालो.  पुण्याहून निघाल्यावर तिथे जाण्यासाठी चांगला रस्ता मुळशी - ताम्हिणी घाट - माणगाव मार्गेच आहे. रस्त्यात पहाटेच्या वेळी असणाऱ्या शांत
वातावरणाचा आस्वाद घेत फोटो काढत आमचा प्रवास सुरु झाला. तिथे आजूबाजूला मस्त डोंगर त्यावर हिरवळ आणि डोंगराच्या मधून घाटाचा मस्त रस्ता... असा वाटत होत जस काही आपल्या आवडीचं एखाद चित्र जिवंत झाल आहे.... 

        
  
 रस्त्यामध्ये सकाळी ८:३० च्या सुमारास आम्ही थोडीशी पेटपूजा करण्यासाठी "शिवराज ढाबा" येथे थांबलो. माणगाव तिथून अंदाजे ३५ ते ४० किमी असेल. तिथला मेनू वाचूनच जाणवलं की आपण कोकणच्या जवळपास आलो आहोत. तिथे जास्त करून मास्यांचा समावेश होता. मेनू मधे डोकावल्यावर मिसळपाव खायचा मूड झाला. पण मिसळ पाव तयार नाहीये म्हटल्यावर आम्ही पोह्यांवर ताव मारला. :) 
        आम्ही ११.१५ च्या जवळपास दिवेआगरला पोचलो. तिथे आम्ही आधीच "श्री शिव समर्थ" इथे एक कॉटेज बुक करून ठेवले होते जे बीचपासून २ मिनिटांच्या अंतरावर आहे. मग त्यांना फोन करून कॉटेजला पोचायचा रस्ता विचारलं. दिवेआगरला समुद्र किनारा असला तरी तिथे हवेत फक्त उकाडा होता पण मुंबईसारखा दमटपणा आणि खारटपणा नव्हता. दिवेआगर तस खूपच छोट गाव आहे. तिथे घरगुती खानावळी पावलोपावली आहेत. पण तिथे १-२ दिवस आधी फोन करून जेवणाची पूर्वकल्पना द्यावी लागते. आम्ही होळीच्या वीकेंडला गेलो होतो म्हणून तिथे जेवणामध्ये गोड पदार्थ पुरणपोळी होती. पण मी फोन करून त्या काकूंना उकडीचे मोदक बनवण्याचा आग्रह केला. :) कारण कोकणात गेल्यावर २ गोष्टी खाण्याचा मोह आवरता येत नाही एक म्हणजे उकडीचे मोदक आणि दुसरं म्हणजे सोलकढी...

             रोजच्या घाईगर्दीच्या रुटीनपेक्षा तिथला शांतपणा खूप हवाहवासा वाटत होता. कॉटेजमधे पोचल्यावर जरास फ्रेश होऊन आम्ही ज्यांच्याकडे जेवायला जाणार होतो त्यांना आम्ही २ पर्यंत जेवायला येऊ असे सांगितले. मला समुद्र पहायची घाई झाली होती. म्हणून जेवायला जायच्या आधीच आम्ही समुद्रावर चक्कर मारायला गेलो. खूप उन असूनही जास्त उकाडा जाणवत नव्हता. तिथे बीचवर जाताना रस्त्यात एक सूचना फलक लावला होता. त्यात सगळ्यात Interesting सूचना होती "कमी व आखूड कपड्यात गावात फिरू नये." ;) ही ही नारळाच्या झाडांमधून वाट काढत काढत आम्ही पोचलो एकदाचे समुद्रावर...  मस्त फोटोस काढणे सुरु झाले. माझ आवडीच काम म्हणजे शिंपले शोधण सुरु झाल... आणि मला तिथे अगदी जवळ असलेले दोन शिंपले सापडले. :) पोटात कावळे ओरडायला लागल्यावर भूक लागल्याच लक्षात आल.. मग आम्ही लगेच निघालो. त्या काकुंच घर मस्त कोकणी पद्धतीच कौलारू होत.. मी आणि आशिष लगेच जेवायला बसलो. जेवणात मऊ मऊ पोळ्या, बटाट्याची आणि भेंडीची भाजी, वरण, गरम गरम भात, पापड आणि उकडीचे मोदक होते. आशिषने उकडीचे मोदक कधीच खाल्ले नव्हते म्हणून त्याला पण उत्सुकता होती. आम्हाला दोघांनाही मोदक खूप आवडले म्हणून २-२ मोदक फस्त केले. गरम गरम मोदक आणि त्यावर घरच तूप.. इतकी मस्त चव माझ्या जिभेवर रेंगाळत आहे. :D त्या काकूंनी अजून आग्रह करून पुरणाची पोळी पण खायला लावली. इतका जेवण झाल होत की उठावस पण वाटत नव्हत... तिथे थोडीशी जरी जागा मिळाली असती ना तर तिथेच झोपलो असतो. :) मग आम्ही ३ च्या सुमारास कॉटेजकडे निघालो.
                                                                                                                                                      क्रमशः
 








भारतीय संघाला आजच्या विश्वचाशकातील अंतिम सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा...!!!




         आज मी खूप दिवसांनी ब्लॉग लिहित आहे. खूप विचार मनात येत राहिले पण ते लिहायला मात्र वेळ मिळाला नाही. नवीन वर्षात मात्र आज मुहूर्त लागला. :) 
       आज मला काहीतरी नवीन गोष्ट तुमच्याशी share करायची आहे. माझ्या ब्लॉग वर "Blog Archive" च्या खाली "तुम्ही इथे भेट दिली आहे का?" ह्या सदराखाली"Snovel" नावाची एक लिंक आहे. त्याबद्दल मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे.       
       आजच्या धकाधकीच्या जगात आपल्याला सगळ्यात जास्त कमतरता जर कुठल्या गोष्टीची भासत असेल तर ती म्हणजे निवांत वेळ. वेळेअभावी आपण अशा अनेक महत्वाच्या गोष्टींना मुकतो ज्यांची मजा एकेकाळी आपण खूप लुटली. कित्येक जणांना आपले छंद जोपासायला सुद्धा वेळ मिळत नाही. त्यातलाच एक छंद म्हणजे वाचन. रोजचं वर्तमानपत्र वाचायला वेळ नसतो तर पुस्तक कसं वाचणार? 
       पण ज्या नव्या युगाने हा प्रश्न निर्माण केला त्यानंच त्याचं उत्तरही दिलं, ते आहे अर्थातच "बोलती पुस्तकं" म्हणजेच आपण त्याला सध्या Audio Books म्हणून ओळखतो. ही Audio Books म्हणजे CDs असतात. English मधे अनेक पुस्तकांचे Audio Books उपलब्ध असतात, पण मराठी भाषेत हा विचार त्यामानाने नवीन आहे (वपु, पुलं आणि अश्या काही नावाजलेल्या लेखकांची कथाकथनं वगळता). Snovel India ह्या कंपनीने Audio Books बनवण्याचे आणि त्यांना बाजारात उपलब्ध करून देण्याचे काम सुरु केले आहे. आजकाल MP3 Players सगळीकडे उपलब्ध असतात, मग त्यांचा असाही वापर करायला काय हरकत आहे. पण ही Audio CD कशी असेल ते पाहायचे असेल तर आपण http://www.snovel.in ह्या लिंकला भेट देऊ शकतो. तिथे "Samples" ह्या tab मधे तीन वेगवेगळ्या पुस्तकांचे काही मिनिटांचे Audio Tracks आहेत. आणि ह्या लिंकवर अजूनही बरीच माहिती मिळू शकते. 
        साऊंड + नॉव्हेल = स्नोवेल अशी ही संकल्पना आहे. त्यामुळे वाचनीय साहित्य आता श्रवणीय होत आहे. आणि ह्या संकल्पनेमुळे जी चांगली पुस्तके काही कारणाने वाचनात नाहीयेत ती सुद्धा रसिक वाचकांपर्यंत पोचतील. रस्त्याने चालताना, बसमध्ये बसल्याबसल्या, काम करताना, किंवा रात्री झोपी जाताना (आठवतं, लहानपणी आजीच्या गोष्टी ऐकत झोपी जायला काय मजा यायची!) आपण जेव्हा पुस्तक ऐकू शकतो, तेव्हा पुस्तक वाचायला वेळ मिळत नाही अशी तक्रार आता नाही करता येणार. आता ह्या Audio CDs म्हणजे लेखनाचं जसं च्या तसं अभिवाचन असावं असा सहज विचार आपल्या मनात येईल...पण तसं न करता, संबंधीत लेखक आणि तज्ञांशी चर्चा करून लेखनात अभ्यासांती अनुकूल बदल घडवून ते श्राव्य-संपूर्ण बनवणं हे स्नॉवेलच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणता येईल. मग त्यासाठी पार्श्वसंगीताचा परिणामकारक प्रयोग असो वा आवश्यकतेनुसार कथेतील पात्रांची केलेली आखणी असो.
        आत्ताच २ महिन्यांपूर्वी डिसेंबरमधे ८४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाणे इथे भरले होते. तिथे स्नोवेलचा पण एक stall होता. आणि तिथे सुद्धा रसिक वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. साहित्य जगतातील मान्यवर लोकांनी पण तिथे भेट दिली आणि हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे आवर्जून सांगितले. स्नोवेलचे आगामी आकर्षण म्हणजे येणारी Audio Books आहेत - कथामोकाशी (दि. बा. मोकाशी), समुद्र (मिलिंद बोकील), सारे प्रवासी घडीचे (जयवंत दळवी) आणि  शितू (गो. नी. दांडेकर).....
         Snovel Media Launch - लोकार्पण सोहळा लवकरच होणार आहे. ह्या कार्यक्रमाला सगळ्या रसिक वाचकांना आणि हा प्रयत्न आवडलेल्या लोकांना आमंत्रण आहे. कार्यक्रमाचे तपशील खाली दिलेले आहेत : 

कार्यक्रम - Snovel Media Launch - लोकार्पण सोहळा
दिवस - १९ फेब्रुवारी, २०११ 
वेळ - सकाळी ११ ते २. 
स्थळ - S.M जोशी सभागृह, "निवारा"च्या समोर, 
          नवी पेठ पुणे. 

तुम्हाला जर हा प्रयत्न आवडला असेल किवा तुम्हाला जर काही अभिप्राय - सुचना द्यायच्या असतील तर तुम्ही snovel.india@gmail.com इथे ईमेल लिहुन संपर्क साधू शकता. आपल्यासारख्यांच्या रसिक वाचकांची उपस्थिती तिथे अपेक्षित आहे.