मला अजूनही आठवतात लहानपणीचे दिवस... तेव्हा काही कळत नसायचं पण सगळ्या गोष्टींच कुतुहूल असायचं... खूप छोट्या छोट्या गोष्टींमुळे आनंद मिळायचा तेव्हा...  सरांनी सगळ्या वर्गासमोर कौतुक केल की होणारा आनंद....  मित्र मैत्रिणींसोबत मनसोक्त खेळायला मिळाल्याचा आनंद... आईने डब्यात आवडीच काही दिले असेल की होणारा आनंद... कधी कधी अचानक सुट्टी मिळाली की विचारायलाच नको... आणि सगळ्यात जास्त आम्ही वाट पहायचो ते दिवाळीच्या सुट्ट्याची... महिनाभर आधीपासून सुट्टीचे बेत आखले जायचे... ह्या गोष्टी आयुष्यातला न विसरता येणारा काळ आहे .... 
         उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही सगळे म्हणजे माझे सगळे मावस अणि मामे भावंड धरून एकूण ८-१० जण आजोळी जमायचो आणि खूप धमाल करायचो. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत तर खाण्याची चंगळ असायची... आजोबा तर आंब्याची मोठ्ठी टोकरी आणून ठेवायचे... सकाळी उठल्यापासून आंब्यावर ताव मारणे सुरु होत असे. मग जेवायला वेळ असेल तर काहीतरी हलका फुलका नाश्ता पुन्हा होत असे. मग आज्जी आणि सगळ्याच्या आई अंघोळ करून घ्या म्हणून मागे लागत असत. शेवटी नाईलाजाने का होईना सगळे अंघोळी करून घ्यायचे. मग सगळ्यांची पंगत बसायची जेवायला. गप्पा मारत आणि मस्ती करत जेवण कधी संपायचे ते कळायचे पण नाही... प्रत्येक जण आज्जीकडे रोज नवी फर्माईश करायचा. आज्जी पण प्रत्येकासाठी आवडीने सगळ बनवायची. नन्तर आमचे खेळ सुरु व्हायचे. दुपारची वेळ असल्यामुळे एकतर सावलीत खेळावे लागायचे किवा मग बैठे खेळ खेळायचो....जस की व्यापार, पत्ते, कॅरम, सापशिडी.. व्यापार तर इतका वेळ चालायचं की बस... जेव्हा तिथे इखादी जागा विकत घ्यायचो किवा त्या जागेवर घर बांधायचो तेव्हा ते सगळ खर असल्याचा फील यायचा. त्यामध्ये असणाऱ्या खोट्या कागदी नोटांना पण खूप जीवापाड जपायचो... :)
          आजोबांकडे मोठ्ठी बाग असल्यामुळे झाडांना पाणी घालायचं एक काम असायचं. हे काम मात्र आलटून पालटून मिळायचा सगळ्यांना आणि मज्जा म्हणजे "मी पाणी घालणार झाडांना" ह्यावरून वाद व्हायचे सगळ्याचे.. कारण इतका राजरोसपणे पाण्यात खेळायचा चान्स कोणालाही सोडायचा नसायचा.. सुट्टीतला अजून एक नियम म्हणजे मंदिरात जाण... आजोबांच्या घरापासून जवळच दत्ताच एक मंदिर होत.. दिवसातून एकदा तरी आम्ही जायचो..  जाताना आम्ही बागेतली फुलं तोडून आज्जीने दिलेल्या परडीमधे ठेवायचो. मग तिथे जाऊन स्तोत्र म्हणणे आणि देवाला प्रदक्षिणा घालणे झाले की थोडावेळ तिथे गप्पा मारणे किवा खेळणे व्हायचे.  परत आल्यावर थोडावेळ टिव्ही पाहणे ... उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एक खूप मोठा आकर्षण म्हणजे दारावर येणारी कुल्फी...  दारावरचे कुल्फीवाले काका न चुकता रोज यायचे आणि आमचा सुद्धा रोज कुल्फी खाण्याचा अलिखित नियम झाला होता. आम्ही अंदाजे ८ ते १० जण बच्चे कंपनी होतो. आणि ह्या कुल्फीच्या मेजवानीमध्ये कधी कधी मोठे लोक पण असायचे. 
         मग संध्याकाळी आम्ही सगळे जण देवासमोर बसून शुभंकरोती आणि पाढे म्हणायचो. नंतर  अंगणामध्ये आम्ही हलकंसं पाणी शिंपडायचो. थोडसं गार झाल की आमची रात्रीची जेवणाची पंगत तिथेच असायची. सगळ तिथे आणून ठेवणं आणि नंतर परत ठेवण आमच लहान मुलाचं काम असायचं. आम्ही सगळेजण हे काम खूप आनंदाने करायचो. ह्या सुट्ट्यांच्या दिवसात आवडीच्या पदार्थांसोबत सगळ्यात जास्त आम्हाला आवडणार्या गोष्टी म्हणजे .. आज्जीच्या हातच आंबटवरण, थंडगार ताक, घरच मस्त लोणचं (आंब्याच, लिम्बाच जे हव ते), कच्च्या कैरीचा तक्कू, salad - कांद्याची पात, मेथीला तिखट आणि मीठ लावून केलेला घोळाणा.... आणि ह्या सगळ्या गोष्टींची चवच अशी होती की पोट भरलं तरी मन भरायचं नाही...
          रात्री झोपायच्या काही तास आधी आम्ही गच्चीवर पण पाणी टाकून ठेवायचो कारण दिवसभर गच्ची उन्हाने खूप तापलेली असायची. मग तिथल पाणी सुकल की आम्ही तिथे गाद्या वगरे टाकून झोपायची तयारी करायचो.. पण लवकर झोपणार्यांपैकी  कोणीही नव्हते. मग आमचा तो वेळ गोष्टी सांगण्याचा असायचा... त्या पण भुतांच्या... मग मधेच काही जणांना भीती वाटायची आणि आईची आठवण यायची... :)  मग घरच्यांचा खूप ओरडा खाल्यावर कसेबसे आम्ही झोपायचो.  तिथे सुद्धा आमच्या जागा ठरलेल्या असायच्या. आणि आमची झोपण्याची रजई पण ठरलेली असायची... मग आज्जीच्या जवळ कोण झोपणार ह्याचे पण नंबर असायचे... हे सगळ नंबर वगरे फक्त भांडण होऊ नये म्हणून... खरच  काय पण ते दिवस होते... ह्या सगळ्या गोष्टींमध्ये महिना कसा निघून जायचा हे कळायचंच नाही...
          या सुट्ट्या मी अजूनही खूप मिस करते... आता हे दिवस फक्त आठवणीमधेच उरले आहेत. ह्या सुट्ट्या म्हणजे आमच्यासाठी वर्षभराच टोनिक होत. पण  आता कित्येक वर्ष झाली आहेत अश्या सुट्ट्या मी घालवल्या नाहीत. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींना enjoy करणं कुठेतरी हरवलं आहे अस वाटत... पण कितीही वर्ष उलटली तरी ही आठवणींची शिदोरी मात्र नेहमीच सोबत असते. त्यामुळे आठवणींचा कप्पा हळूच उघडायचा आणि हवं ते पान वाचायचं.. ह्या busy life मधे refresh होण्यासाठी अजून कोणता चांगला मार्ग असेल? :)