खूप दिवस झाले रोजच्या रुटीनचा जाम कंटाळा आला होता. म्हणून कुठेतरी दूर भटकायला जायचं होत...!! मग आम्ही विचार केला ह्या वेळेस दिवेआगरला जाऊया...! खर तर दिवेआगरला पावसाळ्यात नाहीतर हिवाळ्यात जायला पाहिजे म्हणजे तिथे हिरवे निसर्ग सौंदर्य पाहायला मिळते. आता दिवस उन्हाळ्याचे आहेत तरीही आम्ही २ आठवडयाआधी तिकडे जाऊन आलो. "एक बार जो मैने कमीटमेंट देदी तो मै अपने आप की भी नही सुनती.... ही ही :) 
 
शनिवारी सकाळी ६:३० च्या आसपास आम्ही निघालो.  पुण्याहून निघाल्यावर तिथे जाण्यासाठी चांगला रस्ता मुळशी - ताम्हिणी घाट - माणगाव मार्गेच आहे. रस्त्यात पहाटेच्या वेळी असणाऱ्या शांत
वातावरणाचा आस्वाद घेत फोटो काढत आमचा प्रवास सुरु झाला. तिथे आजूबाजूला मस्त डोंगर त्यावर हिरवळ आणि डोंगराच्या मधून घाटाचा मस्त रस्ता... असा वाटत होत जस काही आपल्या आवडीचं एखाद चित्र जिवंत झाल आहे.... 

        
  
 रस्त्यामध्ये सकाळी ८:३० च्या सुमारास आम्ही थोडीशी पेटपूजा करण्यासाठी "शिवराज ढाबा" येथे थांबलो. माणगाव तिथून अंदाजे ३५ ते ४० किमी असेल. तिथला मेनू वाचूनच जाणवलं की आपण कोकणच्या जवळपास आलो आहोत. तिथे जास्त करून मास्यांचा समावेश होता. मेनू मधे डोकावल्यावर मिसळपाव खायचा मूड झाला. पण मिसळ पाव तयार नाहीये म्हटल्यावर आम्ही पोह्यांवर ताव मारला. :) 
        आम्ही ११.१५ च्या जवळपास दिवेआगरला पोचलो. तिथे आम्ही आधीच "श्री शिव समर्थ" इथे एक कॉटेज बुक करून ठेवले होते जे बीचपासून २ मिनिटांच्या अंतरावर आहे. मग त्यांना फोन करून कॉटेजला पोचायचा रस्ता विचारलं. दिवेआगरला समुद्र किनारा असला तरी तिथे हवेत फक्त उकाडा होता पण मुंबईसारखा दमटपणा आणि खारटपणा नव्हता. दिवेआगर तस खूपच छोट गाव आहे. तिथे घरगुती खानावळी पावलोपावली आहेत. पण तिथे १-२ दिवस आधी फोन करून जेवणाची पूर्वकल्पना द्यावी लागते. आम्ही होळीच्या वीकेंडला गेलो होतो म्हणून तिथे जेवणामध्ये गोड पदार्थ पुरणपोळी होती. पण मी फोन करून त्या काकूंना उकडीचे मोदक बनवण्याचा आग्रह केला. :) कारण कोकणात गेल्यावर २ गोष्टी खाण्याचा मोह आवरता येत नाही एक म्हणजे उकडीचे मोदक आणि दुसरं म्हणजे सोलकढी...

             रोजच्या घाईगर्दीच्या रुटीनपेक्षा तिथला शांतपणा खूप हवाहवासा वाटत होता. कॉटेजमधे पोचल्यावर जरास फ्रेश होऊन आम्ही ज्यांच्याकडे जेवायला जाणार होतो त्यांना आम्ही २ पर्यंत जेवायला येऊ असे सांगितले. मला समुद्र पहायची घाई झाली होती. म्हणून जेवायला जायच्या आधीच आम्ही समुद्रावर चक्कर मारायला गेलो. खूप उन असूनही जास्त उकाडा जाणवत नव्हता. तिथे बीचवर जाताना रस्त्यात एक सूचना फलक लावला होता. त्यात सगळ्यात Interesting सूचना होती "कमी व आखूड कपड्यात गावात फिरू नये." ;) ही ही नारळाच्या झाडांमधून वाट काढत काढत आम्ही पोचलो एकदाचे समुद्रावर...  मस्त फोटोस काढणे सुरु झाले. माझ आवडीच काम म्हणजे शिंपले शोधण सुरु झाल... आणि मला तिथे अगदी जवळ असलेले दोन शिंपले सापडले. :) पोटात कावळे ओरडायला लागल्यावर भूक लागल्याच लक्षात आल.. मग आम्ही लगेच निघालो. त्या काकुंच घर मस्त कोकणी पद्धतीच कौलारू होत.. मी आणि आशिष लगेच जेवायला बसलो. जेवणात मऊ मऊ पोळ्या, बटाट्याची आणि भेंडीची भाजी, वरण, गरम गरम भात, पापड आणि उकडीचे मोदक होते. आशिषने उकडीचे मोदक कधीच खाल्ले नव्हते म्हणून त्याला पण उत्सुकता होती. आम्हाला दोघांनाही मोदक खूप आवडले म्हणून २-२ मोदक फस्त केले. गरम गरम मोदक आणि त्यावर घरच तूप.. इतकी मस्त चव माझ्या जिभेवर रेंगाळत आहे. :D त्या काकूंनी अजून आग्रह करून पुरणाची पोळी पण खायला लावली. इतका जेवण झाल होत की उठावस पण वाटत नव्हत... तिथे थोडीशी जरी जागा मिळाली असती ना तर तिथेच झोपलो असतो. :) मग आम्ही ३ च्या सुमारास कॉटेजकडे निघालो.
                                                                                                                                                      क्रमशः
 








भारतीय संघाला आजच्या विश्वचाशकातील अंतिम सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा...!!!