वाचण्याची आवड असलेल्या प्रत्येक व्यक्तीला दिवाळी अंक वाचण्याच काय सुख असत ते नक्कीच कळेल. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मस्तपैकी फराळाचा आस्वाद घेत दिवाळी अंक वाचत लोळत पडण्यासारख सुख नाही... :) लहान असताना अगदी नेहमीच्या वाचण्यातली पुस्तके म्हणजे "चंपक", "चांदोबा", "ठकठक", "किशोर" आणि "चाचा चौधरी" वगरे. ही सगळी पुस्तके दर महिन्याला तर असायचीच पण दिवाळी अंक असेल तर खूप मोठ्ठा असायचा म्हणून त्याच वेगळं आकर्षण वाटायचं.
         आणि आता सुद्धा ह्या पुस्तकांना वाचताना जरी मजा येत असेल तरी पण काही खास दिवाळी अंक वाचल्याशिवाय चैन पडत नाही. काही आवर्जून वाचण्यासारखे म्हणजे माहेर, मेनका, मानिनी, मिळून साऱ्याजणी, दीपलक्ष्मी, नवल, विपुलश्री आणि मौज वगरे.. ह्या सगळ्या अंकामधला मजकूर अगदी दर्जेदार असतो. एक एक अंक असा जो एकदा हातात घेतला की सोडवतच  नाही. ह्यामध्ये सामाजिक लेख, उत्तमोत्तम मुलाखती, नवीन सिनेमांची परीक्षणं अश्या कित्येक गोष्टी असतात. प्रत्येक अंकामध्ये पाककृतींचा खजिना आवर्जून असतोच.  सगळ्या दिवाळी अंकामध्ये २ गोष्टी नक्की असतात एक म्हणजे दर्जेदार व्यंगचित्रे आणि वार्षिक भविष्य... भविष्य वगरे सारख्या गोष्टीवर विश्वास असो किवा नसो पण उत्सुकतेपोटी एकदा तरी हे भविष्य नजरेखालून घातले जातेच. :) 
          खूप सारी चांगली मासिके आहेत ज्यांचे दिवाळी अंक अगदी खास असतात. तसेच वेगवेगळ्या वृत्तपत्रांचे सुद्धा दिवाळी अंक दरवर्षी प्रकाशित होतात. ह्या सगळ्यांमध्ये येणारे म्हणजे  कालनिर्णय, लोकमत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, सामना, चित्रलेखा, तनिष्का, गृहशोभिका, चारचौघी, श्री व सौ आणि अजून बरेच... चारचौघी मासिकाचे मेहंदी विशेषांक आणि उखाणे विशेषांक हे खूपच खास होते. ज्यांना पोलिसी कथा वाचायला आवडतात त्यांच्यासाठी पोलीस टाईम्स, दक्षता, धनंजय आणि गुन्हेगार हे उकृष्ट दर्जाचे अंक आहेत. ज्यांना विनोदी अंक वाचायला आवडतात त्यांना तर खूप पर्याय उपलब्ध आहेत. जसे की मार्मिक, हसवंती, आवाज, धमाल धमाका, फिरकी, जत्रा, आणि श्यामसुंदर. आवाज आणि जत्रा मासिकांमध्ये मुखपृष्टावर असलेली खट्याळ खिडकी आपल्याला हसवल्याशिवाय राहत नाही. :)
          वैद्यकशास्त्रावर (मेडिकल) ज्यांना वाचन करायला आवडते ते "शतायुषी" अंक घेतल्याशिवाय रहात नाहीत. ह्यामध्ये वेगवेगळ्या रोगांची सखोल माहिती, त्यावर असलेली एकदम नवीन उपचार पद्धती, डॉक्टरांचे सर्जरीचे अनुभव, रुग्णांचे अनुभव आणि त्यांनी किचकट रोगांशी दिलेला अभूतपूर्व लढा ह्या सगळ्या गोष्टी असतात. दरवर्षी ह्यांचा एका खास रोग किवां उपचार पद्धतीचा विशेषांक असतो.
           आजकाल इंटरनेटच्या युगात ज्यांना प्रत्यक्ष पुस्तक वाचायला वेळ नाहीये किवा वाचण्याचा कंटाळा येतो त्यांना ऑनलाईन दिवाळी अंकाचे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत. ह्यापैकी काही ऑनलाईन विकत घ्यावे लागतात तर काही मोफत उपलब्ध असतात.  ह्यावर्षी मी ऑनलाईन "हितगुज"(मायबोलीने प्रकाशित केलेला), "मनोगत" आणि "लोकप्रभा" वाचले आहेत. ह्यावर्षीच्या हितगुजच्या अंकात "तंत्र -मैत्र" ह्या सदरात ऑनलाईन कोर्सविषयीची खूप उपयुक्त माहिती आली आहे. ही माहिती https://www.coursera.org/ इथे सापडेल. तसेच कथाविश्व ह्या सदरात खूप छान कथा आहेत. तर मनोगत मध्ये ह्यावर्षी वेगवेळ्या विज्ञानकथांनी हजेरी लावली आहे. तसेच एक "रिक्त" नावाची कौटुंबिक कथा आहे जी मनाला चटका लावून जाते. आणि मनोगतच्या पाककृती विभागात वेगवेगळ्या प्रकारचे आप्पे, वड्या ह्यांनी खास करून हजेरी लावली आहे. तसेच ह्या वर्षी काही नवीन दिवाळी अंक पहिल्यांदा ऑनलाईन आले आहेत जसे की "मिसळपाव" आणि "ऐसी अक्षरे".
            असे हे दिवाळी अंक सगळ्या वाचकांसाठी बौद्धिक फराळच आहेत. सगळ्या वाचनप्रेमींनी ह्याचा लाभ घ्यावा ह्यासाठी ही पोस्ट टाकण्याचा खटाटोप केला आहे. :)
       






        दिवाळी हा आपल्याकडे लहान-मोठ्यांपासून सगळ्या धर्मांमध्ये मोठ्या प्रमाणांवर साजरा केला जाणारा सण आहे. आणि मला खास करून दिवाळी खूप आवडते. कारण दिवाळी जवळ आली की काही दिवस आधीपासूनच सगळी तयारी सुरु होते. सगळ्यात आधी सुरुवात होते ते खरेदीची. नवीन ड्रेस, फटाके, रांगोळ्या आणि आकाशकंदील किवां तो बनवायचे सामान वगरे... :)
        कोजागिरी पौर्णिमेपासून आपण आकाशकंदील लावतो. लहानपणी आम्ही  उत्साहाने घरीच आकाशकंदील बनवत असू. आजकाल मात्र खरच विकत आणण्यामुळे तो बनायची मजा खूप मिस करत आहे मी. रांगोळी काढणे हा एक आवडीचा कार्यक्रम असायचा. दरवर्षी काहीतरी नवीन शक्कल लढवून रांगोळी सजवायचो. कधी फुलांच्या पाकळ्या, कधी चमकी कधी वेगवेगळ्या पणत्या सजवून केलेली सजावट, कधी लाकडाचा भुसा रंगवून तो रांगोळीत भरायचो आणि कधी कधी तर तांदूळ रंगवून ते रांगोळीमध्ये भरायचो.

           दिवाळीमध्ये न विसरता येण्यासारखी गोष्ट म्हणजे फराळ. दिवाळीच्या २-३ दिवस आधीपासूनच आई फराळ बनवायला सुरुवात करायची. त्यात असायचे ते चिवडा, लाडू, चकली (माझा सगळ्यात आवडता पदार्थ), शेव, करंजी, शंकरपाळे आणि अनारसे. कितीदा तरी आईला मदत करायच्या बहाण्याने काही पदार्थांना थोडे थोडे खाउन पाहिले आहे. :) हा फराळ आजकाल बाराही महिने बाहेर जरी मिळत असेल तरी दिवाळीच्या दिवसांत ह्या फराळाची चव काही वेगळीच लागते. आणि आईच्या हाताची चव ह्या सगळ्या पदार्थांची लज्जत खूप वाढवते.

          दिवाळीच्या पहाटे म्हणजेच नरकचतुर्दशीला लवकर अंघोळ केली नाही तर नरकात जाऊ अशी लहानपणी खूप भीती वाटत असे. :) आणि त्यामुळेच एरव्ही कधी लवकर न उठणारे आम्ही ह्या दिवशी न चुकता लवकर अंघोळ करून घ्यायचो. अभ्यंगस्नान म्हणजे आई आम्हाला अंघोळीच्या आधी ओवाळायची, तेल लावून द्यायची आणि मग मस्त पैकी वासाचे तेल आणि उटणे ह्यासोबत अभ्यंगस्नान पार पडायचे. अजूनही अभ्यंगस्नान असेच पार पडते फक्त आता मी माझ्या सासरी असते. :)

           आम्ही दरवर्षी भाऊबीजेसाठी आजोळी जायचो. तिथे मामा - मावशी आणि   आम्ही सगळे भावंड खूप मजा करायचो. तिथे आजोबांनी आमच्यासाठी फटाके आधीच आणून ठेवलेले असायचे ते पण एकदम भरभरून... :D अगदी काय उडवू  आणि काय नको असा होऊन जायचं. तिथे जो फटाका जरा कमी प्रमाणात असायचा त्याच्यावरूनच सगळ्यांची भांडाभांडी व्हायची. मग कसेतरी करून वाटणी व्हायची आणि थोड्या वेळासाठी शांतता असायची. आणि बच्चेकंपनी म्हणजे आमचे लहान भावंड आमच्याकडून अगदी भांडून फटाके वगरे घायचे पण त्यांना भीती वाटत असल्यामुळे ते उडवण्याची जिम्मेदारी पुन्हा आमच्यावरच यायची. :)     

         आता ही सगळी मजा जरी आठवणींमध्ये राहिली असली तरी नव्या पद्धतीने आपण दिवाळी साजरी करू शकतो. Eco-Friendly दिवाळी साजरी करण्याची आपल्या पर्यावरणाची गरज आहे. जास्त फटाके न फोडता हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण कमी करण्यात आपण हातभार लावायला हवा. ह्या दिवाळीमध्ये सगळ्या वाईट गोष्टी जाळून जावोत, जुनी भांडणे आणि रुसवे - फुगवे विरून जावोत आणि नव्या इच्छांचा आणि नवीन कल्पनांचा दीप सर्वांच्या मनात अखंड तेवत राहो...  सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!!
         


           
           आज मी तुम्हाला आमच्या घरातल्या सगळ्या खास सदस्यांची ओळख करून देणार आहे. माझे लग्न झाल्यावर लहानपणीचा खेळ पुन्हा नव्याने सुरु झाला आहे असच वाटल मला... जस लहानपणी आपण आपल्या आवडत्या खेळण्यांना नाव देतो (विशेषकरून बाहुल्यांना) तस इथे आम्ही घरातल्या काही वस्तूंना मस्त नावे दिली आहेत. सगळ्यात आधी सांगेन ते आमच्या TV बद्दल... त्याच घरातलं लाडक नाव आहे "स्टीव्ही".. आशिष (माझा नवरा) F.R.I.E.N.D.S. च्या series चा जबरदस्त चाहता आहे. आणि हे नाव त्या series मधूनच घरात आले आहे. आणि आमच्या स्टीव्हीची खासियत म्हणजे ह्यामध्ये PIP (Picture In Picture) आहे. म्हणजे ह्यात एकाच वेळेस २ channels पाहता येतात. अर्थात आवाज एका channel चा ऐकू येतो पण हरकत नाही... :)
          अजून एक सदस्य म्हणजे आशिषची bike जिच नाव "सूझी" आहे. एकदम गर्लफ्रेंडच नाव असाव अस नाव आहे हीच.... ही पण फार लाडकी आहे आमची.... आम्ही बंगलोरला असताना तिच्यासोबतीने बंगलोर ते म्हैसूर अशी मस्त outing केली आहे.
         आणि त्यानंतर आहे आमचा लाडका "चिंटू" म्हणजेच आमचा laptop ह्याचे लाड सगळ्यात जास्त होतात. त्याला सतत कोणीतरी मांडीवर घेऊन बसलेले असते. आणि हा चिंटू आमच्या लग्नाच्या आधीपासून घरात असल्यामुळे पर्यायाने मी ह्याची सावत्र आई आहे म्हणे.. :) ह्याचे खरे कारण असे कि मी वापरल्यानंतरच काही दिवसात चिंटूची battery जरा खराब झाली म्हणजे लवकर discharge व्हायला लागली. कारण मी त्याचा सावत्र असल्याने जाच केला आहे म्हणे :( त्याचे कितीही लाड केले तरी शेवटी मी सावत्र आई आहे हे काही सत्य बदलणार नाही ना.. ;) काय करणार हे सुद्धा पचवले आहे मी आतापर्यंत....
           आमच्या घरी जुळे सदस्य पण आहेत जे खूपच आवडीने घरात आणले आहेत. त्यांची नावे आहेत "गोलू" आणि "मोलू"  जे दुसर तिसर काही नसून bean bags आहेत. आणि ह्यांना आम्ही हट्टाने एकदम मोठ्ठ्या आकारात बनवून घेतले आहे. कॉफ्फी कलरच्या ह्या bags Double XL नाहीतर त्यापेक्षाही थोड्या  मोठ्या आहेत. आणि इतक्या आरामशीर आहेत की त्यात कित्येकदा मी दुपारी जेवण झाल्यावर पेंगत पेंगत निवांत झोपले आहे. :D
          आमच्याकडे एक MP3 player नाहीतर i Pod म्हणता येईल असा पण एक सदस्य आहे. त्याचे नाव "झून" आहे. दिसायला एकदम ओबडधोबड असा आहे पण खूपच मजबूत आहे. खूप वेळा तो हातातून पडला आहे पण इंचभरही खरचटले नाहीये त्याला.. :) आमच्या सगळ्या outings मध्ये न थकता त्याने आम्हाला साथ दिली आहे. ५ ते ६ तास सलग वापरले तरी त्याला जेवायची म्हणजेच charge करायची गरज पडत नाही. :)
          आणि शेवटचा सदस्य म्हणजे आशिषचा फोन. त्याच नाव पण एकदम  cool आहे "रोमिओ"...  आता अस का आहे नाव हे मला अजूनही माहित नाहीये पण म्हटलं जाऊ दे तितकच काहीतरी वेगळ... :) तर ही  सगळी मंडळी आमच्या दोघांनाही आमच्या मुलांसारखी आहेत. ज्यांना कोणाला ह्या मंडळीची नावे माहित आहेत  ते पण त्यांना आवर्जून ह्याच नावांनी हाक मारतात. अजून नवीन सदस्य जमेल तसे घरी येत राहतील. तोपर्यंत आम्ही ह्या गोतावळ्यासोबत सुखाने नांदत आहोत. :)          
          





आजचा दिवस अतिशय शुभ समजला जातो. कारण हा मराठी संवत्सरातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. त्यामुळे कोणतेही नवीन कार्य ह्या दिवशी सुरु करतात. लहान मुलांकडून ह्या दिवशी सरस्वतीचे पूजन करवून त्यांच्या  शिक्षणाचा श्रीगणेशा करतात.

पुराणकाळात महिषासूर नावाचा एक राक्षस होऊन गेला. आपल्या दुष्ट कृत्यांनी त्याने पृथ्वीवर हाहाकार माजवला होता. त्याचा वध एका स्त्री च्या हातून होईल आणि अन्य कोणी त्याला मारू शकणार नाही असा त्याला वर मिळालेला होता. अशी स्त्री तिन्ही लोकात नाही म्हणून तो खूपच उन्मत्त झाला होता. तेव्हा अष्टभुजा देवीने अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी असे दहा दिवस त्याच्याशी तुंबळ युद्ध करून दहाव्या दिवशी त्यास ठार मारून त्याच्यावर विजय मिळवला. म्हणून या नऊ  दिवसांना नवरात्री आणि ह्या दहाव्या दिवसाला 'विजयादशमी' असे म्हणतात. शौर्य, विजय, संपत्ती आणि विद्या देणारा हा महत्वाचा दिवस आहे.

त्या काळी रघु नावाचा एक उदार आणि विद्वानांना आश्रय देणारा एक राजा होता. कौत्स नावाच्या ब्राम्हणाला गुरुदक्षिणा म्हणून आपल्या गुरूंना १४ कोटी सुवर्णमोहरा हव्या होता. तेव्हा कौत्स मदत मागण्यासाठी रघु राजाकडे आला. रघु राजने आपली सगळी संपत्ती आधीच दान केल्यामुळे त्याचाकडे इतकी संपत्ती नव्हती. पण त्याने कौत्साला ३ दिवसात इतक्या सुवर्णमोहरा देण्याचे आश्वासन दिले. आणि रघु राजाने इंद्रासोबत युद्ध पुकारले. तेव्हा कुबेराने घाबरून अयोध्यानगरच्या बाहेरील शमीच्या आणि आपट्याच्या झाडांवर सुवर्णमोहरांचा वर्षाव केला. तेव्हा रघु राजाने त्यातील फक्त १४ कोटी सुवर्णमोहरा कौत्साला दिल्या आणि बाकी सगळ्या मोहरा प्रजाजनांमध्ये लुटवून टाकल्या. त्याचे प्रतिक म्हणून आजच्या दिवशी शमीच्या झाडाची किवा आपट्याच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. पूजा झाल्यानंतर ह्या झाडांची पाने लुटतात आणि ती आप्तेष्टांना सोने (सुवर्णमोहरांचे प्रतिक) म्हणून वाटतात.

ह्याच दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करण्यासाठी प्रस्थान केले आणि त्यांना विजय मिळाला म्हणून हा दिवस शुभ मानतात. तसेच अज्ञातवासात पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडात लपवून ठेवली होती अशी आख्यायिका आहे. आणि अज्ञातवासानंतर पांडवांनी ह्याच झाडातून आपली शस्त्रे धारण केली. म्हणून ह्या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते. ह्या दिवशी सरस्वतीपूजनासोबतच घरामध्ये असलेल्या वाहनांची आणि पोथी - पुराणांची पूजा केली जाते. आणि व्यापारी लोक ह्या दिवशी आपल्या यंत्रसामुग्रीची आणि कामाच्या हत्यारांची पूजा करतात.  आणि हा दिवस सोने खरेदीसाठी सुद्धा शुभ मानला जातो.

म्हणूनच सर्व वाचकांना हा सण खूप आनंदाचा आणि भरभराटीचा जावो...!!!  "दसरा सण मोठा आणि नाही आनंदाला तोटा..!!!"



आज Friendship Day निम्मित माझ्या डायरीतून माझ्या सगळ्या मित्र- मैत्रिणींसाठी काही ओळी...
शिंपल्यात घालून समुद्र कधी दाखवता येत नाही
हाताने काढलेल्या फुलांचा कधी सुगंध येत नाही
निळ्याभोर गगनाचा अंत कधी होत नाही
खऱ्या मैत्रीपूर्ण भावनांचा उल्लेख शब्दात कधी होत नाही..



आज खूप दिवसांनी ब्लॉगवर काहीतरी टाकण्याचा मूड झाला... मनात विचार आला की अश्या कितीतरी म्हणी असतील ज्या आधीच्या काळात नेहमी बोलण्यात येत असतील पण आता त्या माहीत सुद्धा नसतील... ह्या म्हणींना आठवण्याचा एक प्रयत्न म्हणून मी माझ्या आजीला हट्ट करून करून काही  म्हणी आठवायला लावल्या आणि त्या मी इथे टाकत आहे... ह्यातल्या बऱ्याच म्हणी कदाचित माहीत असतील पण तरीही जराशी मजा म्हणून...

- वेल्हाळीला दुक्ख झाल चोळून चोळून लाल केल...
- खादाड खाऊ लांडग्याचा भाऊ..
- नाकापेक्षा मोती जड
- दात आहेत तर चणे नाहींत आणि चणे आहेत तर दात नाहीत
- बाजारात तुरी भट भटणीला मारी
- नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा
- आवळा देऊन कोहळा काढणे
- ताकाला जाऊन भांड लपवणे
- मला पहा आणि फुलं वाहा
- तोंडात तीळही न भिजणे 
- आपला तो बाब्या आणि दुसर्याचे ते कार्टे
- सोय जाणेल तो सोयरा
- दुसर्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसत पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही
- घोडा आपल्या गुणाने दाणा खातो
- घरात नाही दाणा म्हणे मला बाजीराव म्हणा
- कोंबडा आरवला नाही तरी उजाडायच राहत नाही
- सरड्याची धाव कुंपणापर्यंत
- जावायाच पोर हरामखोर
- मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली (ही म्हण मकरंद अनासपुरेच्या तोंडून एका पिक्चरमधे ऐकली आहे... :) )