आजचा दिवस अतिशय शुभ समजला जातो. कारण हा मराठी संवत्सरातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. त्यामुळे कोणतेही नवीन कार्य ह्या दिवशी सुरु करतात. लहान मुलांकडून ह्या दिवशी सरस्वतीचे पूजन करवून त्यांच्या  शिक्षणाचा श्रीगणेशा करतात.

पुराणकाळात महिषासूर नावाचा एक राक्षस होऊन गेला. आपल्या दुष्ट कृत्यांनी त्याने पृथ्वीवर हाहाकार माजवला होता. त्याचा वध एका स्त्री च्या हातून होईल आणि अन्य कोणी त्याला मारू शकणार नाही असा त्याला वर मिळालेला होता. अशी स्त्री तिन्ही लोकात नाही म्हणून तो खूपच उन्मत्त झाला होता. तेव्हा अष्टभुजा देवीने अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी असे दहा दिवस त्याच्याशी तुंबळ युद्ध करून दहाव्या दिवशी त्यास ठार मारून त्याच्यावर विजय मिळवला. म्हणून या नऊ  दिवसांना नवरात्री आणि ह्या दहाव्या दिवसाला 'विजयादशमी' असे म्हणतात. शौर्य, विजय, संपत्ती आणि विद्या देणारा हा महत्वाचा दिवस आहे.

त्या काळी रघु नावाचा एक उदार आणि विद्वानांना आश्रय देणारा एक राजा होता. कौत्स नावाच्या ब्राम्हणाला गुरुदक्षिणा म्हणून आपल्या गुरूंना १४ कोटी सुवर्णमोहरा हव्या होता. तेव्हा कौत्स मदत मागण्यासाठी रघु राजाकडे आला. रघु राजने आपली सगळी संपत्ती आधीच दान केल्यामुळे त्याचाकडे इतकी संपत्ती नव्हती. पण त्याने कौत्साला ३ दिवसात इतक्या सुवर्णमोहरा देण्याचे आश्वासन दिले. आणि रघु राजाने इंद्रासोबत युद्ध पुकारले. तेव्हा कुबेराने घाबरून अयोध्यानगरच्या बाहेरील शमीच्या आणि आपट्याच्या झाडांवर सुवर्णमोहरांचा वर्षाव केला. तेव्हा रघु राजाने त्यातील फक्त १४ कोटी सुवर्णमोहरा कौत्साला दिल्या आणि बाकी सगळ्या मोहरा प्रजाजनांमध्ये लुटवून टाकल्या. त्याचे प्रतिक म्हणून आजच्या दिवशी शमीच्या झाडाची किवा आपट्याच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. पूजा झाल्यानंतर ह्या झाडांची पाने लुटतात आणि ती आप्तेष्टांना सोने (सुवर्णमोहरांचे प्रतिक) म्हणून वाटतात.

ह्याच दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करण्यासाठी प्रस्थान केले आणि त्यांना विजय मिळाला म्हणून हा दिवस शुभ मानतात. तसेच अज्ञातवासात पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडात लपवून ठेवली होती अशी आख्यायिका आहे. आणि अज्ञातवासानंतर पांडवांनी ह्याच झाडातून आपली शस्त्रे धारण केली. म्हणून ह्या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते. ह्या दिवशी सरस्वतीपूजनासोबतच घरामध्ये असलेल्या वाहनांची आणि पोथी - पुराणांची पूजा केली जाते. आणि व्यापारी लोक ह्या दिवशी आपल्या यंत्रसामुग्रीची आणि कामाच्या हत्यारांची पूजा करतात.  आणि हा दिवस सोने खरेदीसाठी सुद्धा शुभ मानला जातो.

म्हणूनच सर्व वाचकांना हा सण खूप आनंदाचा आणि भरभराटीचा जावो...!!!  "दसरा सण मोठा आणि नाही आनंदाला तोटा..!!!"